अहमदनगर - निर्यात बंदीनंतर कांद्याचे भाव पडले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकरी भाजपाच्या खासदारांना कांदे मारण्याचे आंदोलन करतील, असा निर्णय श्रीगोंदा येथे झालेल्या नगर व पुणे जिल्ह्याच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला.
शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे. कांद्याचे ठोक विक्री दर ६० रुपये किलोच्या पुढे गेल्या नंतर केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद केली, साठ्यांवर मर्यादा घातली, परदेशातून आयात केली, व्यापांर्यावर छापे टाकून कांद्याचे दर पाडले आहेत.
अनेक शेतकर्यांकडे अद्यपही साठवलेला कांदा आहे. डिसेंबर अखेर व जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नविन कांदा बाजारात यायला सुरुवात होते. हा कांदा बाजारात आल्यानंतर अाणखी दर कोसळण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांच्या हिताचा विचार करून केंद्र शासनाने तातडीने कांदा निर्यात बंदी कायमची उठविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
दि. ३१ डिसेंबर पर्यंत कांदा निर्यातबंदी न हटविल्यास १ जानेवारी पासून कांदा उत्पादक शेतकरी, दिसतील तेथे भाजपाच्या खासदारांना कांदा मारण्याचे आंदोलन करतील असा निर्णय या बैठकीत करण्यात आला.
कांद्या प्रश्नाबरोबरच दिवसा वीज पुरवठा, ऊस दर, दूध दर, वन्य प्राण्यांचा त्रास, साखर कारखान्यातील काटामारी, साखर उतारा चोरी, बाजार समित्यांमधील लूट आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
काटामारी रोखण्यासाठी बाहेरच्या दोन काट्यांवर वजन करून फरक दाखवून साखर कारखान्यावर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. दूधातील भेसळीला आळा घालण्यासाठी सरकारकडे मागणी कारण्यात येइल. बाजार समित्यांमध्ये अद्यापही सुरु असलेल्या गैर व्यवहाराचे पुरावे जिल्हा उपनिबंधक ( सहकार) यांच्याकडे लेखी तक्रारी करून संबंधीत सचीव व संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या बैठकीत शेतकरी संघटनेच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्ष पदावर संगमनेरचे मधूकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर विक्रम शेळके, नेवासा तालुका अध्यक्ष पदावर कुलदीप देशमुख, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदावर पोपट झगडे, श्रीगोंदा ता. उपाध्यक्ष पदावर बालासाहेब सातव यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हा अध्यक्ष पदावर लक्ष्मण रांजणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीगोंदा फॅक्टरी येथील अनिल घनवट यांच्या निवास स्थानी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल चव्हाण, प. महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे उपस्थित होत्या. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनील घनवट यांच्या अध्यक्षतेखाली बेठक संपन्न झाली.