'नाशिक - जिल्ह्यात अजून कोरोनाची पहिलीच लाट संपण्याऐवजी तिच्यात चिंताजनक वाढ होत आहे. कोरोना बरा झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा कोरोनाबाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात तात्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जनतेला कोरोनाची तीव्रता समजली आहे, आता कोरोनाला गांभिर्याने घेण्याची गरज आहे; नाही तर पूर्वीप्रमाणे कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या सप्टेंबर महिन्यापर्यंत काही प्रमाणात कमी झाली होती. परंतू दसरा, दिवाळी या सणानंतर दररोज साधारण 80 ते 100 ने रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे पहिली लाट संपलेली नाही.
कोविड उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पुन्हा कोरोनीची लक्षणे दिसू लागल्याने त्यांच्यावर देखील उपचार करणे आवश्यक असल्याची बाब जिल्हाधिकारी मांढरे यांनी पालकमंत्री यांचे निदर्शनास आणून दिली असता, आजारामधून बरे झालेल्या रुग्णांना देखील काही प्रमाणात वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहे.
पोस्ट कोविड सेंटरच्या माध्यमातून कोविडमधून बरे झाल्यानंतर देखील रुग्णांनी काय काळजी घेण्यात यावी, याबाबत आरोग्य यंत्रणेने नागरिकांमध्ये प्रचार व प्रसिद्धी करावी ज्यामुळे कोविडबाधित आणि कोविडमधून बरे झाल्यानंतरच्या रूग्णांमधील वाढीला वेळीच नियंत्रणात आणणे शक्य होईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शासनाच्या निर्देशांनुसार दैनंदिन कोविड चाचण्यांची संख्या देखील वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. कोविड चाचण्यांचा तपासणी अहवाल त्याच दिवशी मिळण्यासाठी ऑटोमॅटिक एक्स्ट्रशन मशिन देखील बिटको रुग्णालयात बसविण्यात येणार आहे.
ज्याप्रमाणे जिल्ह्यात ऑक्सिजनसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे टेस्टींग लॅबच्या माध्यमातून जिल्ह्याबाहेरील यंत्रणावर अवलंबून न राहता आपल्या जिल्ह्यातच तपासणी अहवाल मिळू शकतील आणि आपण स्वत:च्या ताकदीवर या संकट काळात उभा खंबीरपणे उभे राहू, असे नियोजन प्रशासनाने केलेले आहे असेही भुजबळ यांनी सांगितले.
मालेगावप्रमाणेच नाशिक शहरातील काही भागात नागरीकांची हर्ड इम्युनिटी तपासण्यासाठी सिरो टेस्ट करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर ज्या ठिकाणी हा पहिला अधिक होण्याची शक्यता आहे, अशा भागांमध्ये तातडीने महानगरपालिकेचे वतीने 'सिरो टेस्ट' करावी असे ठरले.
त्याचप्रमाणे कोविड याआजारावरील लस येईपर्यंत सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. यासाठी दुकानदारांनी 'नो मास्क', 'नो इंट्री मास्क' या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून मास्क न लावलेल्या ग्राहकांसोबत कोणताही व्यवहार करू नये.
अन्यथा संबंधित दुकानदारांचे दुकान दोन दिवस सक्तीने बंद ठेवण्याची कारवाई करण्यात यावी तसेच रिक्षा चालकांनीही याबाबत दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.
आजच्या परिस्थितीत जिल्ह्यात दर दिवसाला 10 मेट्रीक टन ऑक्सिजन लागत असून 84 मेट्रीक टन ऑक्सिजनसाठी उपलब्ध आहे. तसेच संभाव्य रुग्ण वाढ लक्षात घेता 18 हजार 550 बेडस् देखील जिलह्यात उपलब्ध आहेत. तसेच जिल्ह्यात कोविड चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टिने देखील नियोजन केले आहे.