नवी दिल्ली - केंद्र सरकारने पारित केलेले तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय तातडीने घ्या, अन्यथा या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळेल, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते बिंदर सिंह गोलेवाला यांनी केंद्र सरकारला दिला आहे. आज शुक्रवारी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला.
दिल्लीच्या सर्व सीमा जवळपास दोन लाख शेतकऱ्यांनी अडवल्या असून कृषी कायदे मागे घ्यावेत व ‘एमएसपी’ कायदा आणावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारसोबतच शेतकरी प्रतिनिधींच्या अनेक बैठका झाल्या असल्या तरी कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांना कायदे नको आहेत आणि केंद्र सरकार कायदे मागे घ्यायला तयार नाही.
या एक महिन्याच्या काळात 35 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सरकारतर्फे शेतकरी नेत्यांना दोनवेळा लेखी प्रस्ताव पाठविण्यात आलेत आणि आम्ही चर्चेला तयार आहोत असे कळविले आहे. परंतु केवळ कायद्यात सुधारणा करू हेच सांगितल्या जाते. त्यापेक्षा पुढची पायरी चढायला सरकार तयार नाही.
बुराडी मैदानावर आंदोलनाला बसलेले शेतकरी नेते गोलेवाला यांनी आमची परीक्षा पाहू नका, आमच्यात जिद्द आहे आणि जगभराचा पाठिंबा या आंदोलनाला मिळवू असा इशारा सरकारला दिला आहे. महिना झाला तरी आंदोलन मागे घेतले गेलेले नाही. अजूनही हे आंदोलन किती दिवस चालेल हे अनिश्चित आहे.