ब्रिटनमध्ये करोनाचे पुन्हा दुसरे भीषण रूप,संसर्ग पुन्हा थैमान घालतोय. काल ब्रिटन मधून भारतात येणारे विमान दिल्लीत आले आणि तपासणीत अनेक प्रवाशांना करोना संसर्ग. हे वाचून, दूरचित्रवाणीवर पाहून धक्का बसला..
खरेतर जवळजवळ 10 महिने या संसर्गामुळे आपण ज्या परिस्थितीत जगलो.. अनेक जीव गमावले.. आर्थिकदृष्ट्या नाजूक परिस्थिती झाली. हे सगळ भयावह होतं आणि आहे. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता ते अनुभवण्याची वेळ आपल्यावर नियतीने आणली..
या साऱ्या भयानक स्थितीचाही गैरफायदा घेणारे महाभाग आहेतच या जगात, तसे आपल्या आसपासही आहेतच.. ही जमात म्हणजे टाळू वरचे लोणी खाणारी.. तिथे सरकारी जबाबदार अधिकारी असलेली माणसे ही मानवतेचा, कर्तव्याचा विचार न करतां पैसा कमावण्यासाठी कशी चटावलेली असतात हे सगळ्यांनी पाहिलं आहे.
जमाना बदलला, भावना बदलत चालली आहे. सुखाच्या मग ते अफरातर करून मिळालं तरी चालेल, प्रेताच्या रांगेवर चालत त्यावर स्वताच्या नावाची रांगोळी काढून रक्ताळलेला हात कौतुकाने पाहणारे अधिकारी पाहिले की भारत जगाच्या भ्रष्टाचाराच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर असावा अशी खात्री पटते.
जगात जेवढे सरकारी अधिकारी असतील त्यात माणुसकी विसरून कुठे कसा हात मारता येईल, अशा विचारांचे अधिकारीही आपल्याकडे जास्त असतील. पण, आपण समाजाचे काही देणं लागतो, या युद्ध संकटात मला माझे योगदान द्यायलाच हवे, यासाठी स्वताच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडणारे लाखों करोना योद्धा ही आपल्याकडे प्रचंड आहेत आणि यावरच आपण तरणार आहोत ही खात्री आहे.
म्हणून आपला देश विविध क्षेत्रातील सेवाभावी लोकांमुळे महान आहे. या साऱ्या देव माणसांना सलाम. आपण सगळे काळजी घेऊ या... विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना करोनाची लागण.. यावरून आठवल, याचं वेळी संबंधितांनी गांभीर्याने याकडे पाहायला हवे.. नाहीतर पुन्हा एका वरून लाखोंच्या संख्येत वाढ व्हायला फारसा वेळ लागणार नाहीं. त्यामुळे कोरोंनटाइन करताना कोणत्याही प्रकारची ढिलाई होऊ नये असं वाटतं.
कारण, आमच्या शहरात अतिशय संवेदनशील, काटेकोर नियम लावले असतानाच्या काळात बाहेर गावाहून म्हणजे पुणे, मुंबई आदी बड्या शहरातून आलेल्या प्रवाशांना इंस्टीट्युनल कोरोनटाईनसाठी अनेक कॉलेज, हॉटेल्स प्रशासनाने राखून ठेवली होती. आणि हे बंधनकारक होत. परंतु येणारा प्रवासी किंवा त्याला घ्यायला येणारा इथला त्याचा नातेवाईक या दोघांचीही इच्छा नसायची की आपल्या माणसाने कोरोनटाइन व्हावं..
मग झाला धंदा सुरू... पैसे द्या आणि इन्स्टीट्यूनल कोरोनटाईन ऐवजी होम कोरोनन्टाइनच पत्र घेउन हातावर शिक्का मारून घ्या. मला या सर्व सेवाभावी अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांच्याविषयी नितांत आदर आहे. पण काही महाभाग असतातच... यांच्याकडे नजर ठेवायला हवी. आणि सापडला तर सरळ देशद्रोहाचा खटला भरून लाथ मारून हाकलून द्यायला हवं..
कारण अशा भयानक महामारीच्या काळात जर एखादा कर्मचारी, अधिकारी असे जीवघेणे कृत्य करून अनेकांच्या जीवाला धोका उत्पन्न करीत असेल, तर त्या व्यक्तीला सरकारी यंत्रणेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. या गोष्टी घडल्या आहेत. ही शोकांतिका आहे. स्वतःचा माणूस घरी आणून कसा बसवायचा.. या विचाराने कोणी पुढेही येणार नाही. हेच खरे दुर्दैव आहे.
या काळात अशी अनेकांनी आपली चांदी करून घेतली आहे. हा विचार कसा येऊं शकतो याचच खरतर नवल वाटतं.. काही डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस स्वताच्या जीवाचा, विश्रांतीचा, जेवणाचा विचार न करता आपली सेवा प्रामाणिक पणे देतं असताना.. असं इतर शहरांत, विमानतळावर काही होऊ नये.. एव्हढच.
- जयंत येलुलकर, अहमदनगर