अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या वैदकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. जरे यांच्या खुनामुळे सामाजिक व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांचा खून नेमका कोणी केला, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यासोबत गाडीमध्ये त्यांचा मुलगा, आई आणि एक शासकीय अधिकारी देखील होत्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी जरे यांच्यावर तलवारीने वार केले.
रेखा जरे यांच्याबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनीही रुग्णालयात येऊन या प्रकरणाची चौकशी केली.
जरे यांच्या कारची काच एका दुचाकीला लागल्यामुळे वाद झाला. त्या वादातूनच रेखा जरे यांच्या मानेवर वार करण्यात आले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जरे यांच्या मुलाने पोलिसांना दिली आहे. दुचाकीवर दोन जण होते. ते नेमके को होते, याबाबत अधिक तपशील अजून समोर आलेला नाही.