अहमदनगर - संघटितपणे गुन्हेगारी कृत्य करणारांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाईचा फास आवळण्याची मोहिम पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हाती घेतली आहे. भिंगारच्या लॉरेन्स स्वामी व त्याच्या टोळीविरुद्ध हा प्रस्ताव पोलिस अधीक्षक पाटील यांनी नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून संघटित गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक ठिकाणी आरोपी निष्पन्न होऊन त्यांच्याकडून वारंवार पुन्हा पुन्हा त्याच स्वरूपाचे गुन्हे करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ज्यांच्यावर अधिकाधिक गुन्हे आहे. त्यांची माहिती काढण्यास गेल्या दोन महिन्यापासून सुरुवात झाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी, याअगोदर ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशांवर तडीपारीचे अथवा मोक्कांतर्गत कारवाईचे प्रस्ताव दाखल करून कारवाई केली जाईल, असे सूतोवाच केले होते. त्याची सुरुवात आता केली गेली आहे.
भिंगार येथील लॉरेन्स स्वामी याचा भिंगार येथील टोल नाका तोडफोड प्रकरणांमध्ये समावेश असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी फौजफाट्यासह जाऊन ८ तासाच्या कारवाईनंतर स्वामी याला अटक केली. त्याला सध्या पोलीस कोठडी मिळालेली आहे.
त्या आरोपींमध्ये लॉरेन्स स्वामी (राहणार भिंगार) याच्यासह प्रकाश भिंगारदिवे (राहणार निंबोडी), संदीप शिंदे (राहणार बुरुडगाव), विक्रम गायकवाड (राहणार वाळुंज), बाबा उर्फ भाऊसाहेब आढाव (राहणार वाळुंज), संदीप वाकचौरे, (रा. दरेवाडी), अर्जुन डूबे, (राहणार दरेवाडी) व बाळासाहेब भिंगारदिवे यांचा समावेश आहे.
लॉरेन्स स्वामी याच्यासह अन्य काही आरोपींचा या टोळीमध्ये समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या आरोपींविरुद्ध 10 ते 12 गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोका कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.