अहमदनगर - जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेले आहे. सध्या सगळीकडे बिनविरोध निवडणुकीचे वारे सुरू आहे. तेव्हा शिक्षक बँकेची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली तर शिक्षकांचे पगार लवकर करण्यात येतील, सुट्ट्या जादा देण्यात येतील,नियमित पगारासाठी प्रशासन सहकार्य करील. तेव्हा सर्व शिक्षक संघटनांनी याचा विचार करावा असे मिश्किल आवाहन राज्याचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी केले.
प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांची शिक्षण उपसंचालक म्हणून बढती व बदली झाल्याबद्दल त्यांचा तसेच प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, नगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे आदींचा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षक बँकेच्या भा. दा. पाटील सभागृहांमध्ये सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
टेमकर म्हणाले, केंद्रप्रमुख भरतीबाबत आपण पन्नास टक्के सरळ सेवा व पन्नास टक्के पदोन्नतीचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. शाळा स्तरावर वेगवेगळ्या समित्या कमी करून फक्त शाळा व्यवस्थापन समिती व परिवहन समिती ठेवावी अशी शिफारस केली आहे. जिल्ह्याला धावणारे नाही तर समजून घेणारे अधिकारी लाभले आहेत. काटमोरे यांनी चांगले काम केले.
काठमोरे म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षेचा गेल्या तीन वर्षात दहा टक्के निकाल वाढला. २६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. शिक्षकांचा दरमहा पगार उशिरा होण्यास अनेक कारणे आहेत. त्याला फक्त शिक्षण खाते जबाबदार नाही. अर्थ खात्यामुळे उशीर होतो असे त्यांनी सांगितले.