पाथर्डी रस्त्यावरील फार्म हाऊसवर कोम्बिंग ऑपरेशन
सोलापूर रोड टोलनाका दरोडा प्रकरण
अहमदनगर : एका दरोड्यात सहभाग असल्याच्या संशयावरुन छावणी परिषद पोलिसांनी आज लॉरेन्स स्वामीला अटक केली. भल्या सकाळी सात वाजेपासून पोलिसांनी स्वामी याच्या पाथर्डी रस्त्यावरील फार्म हाऊसवर कोम्बिंग ऑपरेशन राबविले. सोलापूर टोलनाक्यावर 20 नोव्हेंबरला दरोडा पडला होता.
त्यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत टोल नाका चालविणारे व्यवस्थापक अजय शिंदे, कर्मचारी हनुमंत देशमुख व रोखपाल सचिन पवार गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी दरोडेखोरांनी गल्ल्यातील तब्बल 50 हजार रुपये देखील लंपास केले होते. या संदर्भात भिंगार छावणी परिषद पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाचही आरोपींसह अन्य दोघांचा या दरोड्यात सहभाग असल्याची माहिती तपासी पथकाला मिळाली होती. त्यात लॉरेन्स स्वामी याचे नाव तपासात समोर आले होते. त्यामुळे पोलीस पथक स्वामी याच्या मागावर होते. त्यात स्वामी पाथर्डी रस्त्यावरील फार्म हाऊसवर असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली.
त्यामुळे पहाटेच स्वामी याच्या त्या घरावर छापा घालण्याचे नियोजन पोलिसांनी केले होते. त्यानुसार सकाळी सात वाजता पथक स्वामी याच्या बंगल्यासमोर दाखल झाले होते. पोलीस पथक दारात पोचल्याचे समजताच स्वामीने बंगल्याची दारे खिडक्या आतून बंद करुन घेतल्या.
पोलिसांनी अनेक तास ते उघडण्याचा देखील प्रयत्न केला. तथापि, पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यानंतर पोलिसांनी स्वामी यास बाहेर येण्याचे आवाहन केले. अन्यथा दरवाजा तोडावा लागेल, असा इशाराही दिला, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.
अखेरीस पोलिसांनी दुपारी दोनच्या सुमारास दरवाजावर पहारीचे घाव घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र पर्याय संपल्याने लक्षात आल्याने स्वामीने दरवाजा उघडून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.