घटनेने दिलेले आरक्षण टिकवायचे असेल तर 'हे' करा

अहमदनगर - घटनेने दिलेल्या ओबीसीचा हक्क टिकवायचा असेल तर प्रथम ओबीसी म्हणून एकत्र या जात हा विषयच नको, तरच तुम्ही राज्यकर्ते व्हाल. पद आज आहे,  उद्याचे कोणाला माहित. मात्र मला मिळालेल्या पदाचा उपयोग ओबीसींना न्याय देण्यासाठी केला तर जनतेच्या मनात मी कायम राहील, असे प्रतिपादन बहुजन विकास मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी केले. 

ओबीसी व्ही.जे.एन.टी  मोर्चाच्या वतीने आयोजित जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. ओबीसीसाठी छगन भुजबळ यांचा पुढाकार मोठा आहे. गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींसाठी जे केलं तोच वारसा मी स्वीकारला आहे. ओबीसींची जनगणना करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र केंद्राने ही मागणी स्विकारली नाही तर राज्य स्वतंत्रपणे ओबीसींची जनगणना करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी ओबीसींसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. 

ओबीसींची जनगणना झाली तर ‘ज्याची संख्या भारी त्याचा हिस्सा भारी’ असे समीकरण निर्माण होईल. देशांमध्ये 60 टक्क्याच्यावर  ओबीसी दिसेल. हा 60 टक्के ओबीसी समाज गेली सत्तर वर्षे उपेक्षित आहे.  राजकीय,  सामाजिक, आर्थिकदृष्ट्या तो मागासलेला आहे. अलीकडे मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे 19 टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला, पण कुणबीच्या खोट्या दाखल्यामुळे ते हिरावलं गेलं.

जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तो पर्यंत एम.पी.एस.सी.च्या निवडींना काही उपद्रवी लोकांनी आडकाठी आणली आहे. मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र त्यांचा ओबीसीत समावेश नको, ही आपली भूमिका आहे.  मात्र त्यालाही उपद्रवी लोक आमचं होत नाही, मग तुमचं कशाला, असे म्हणत आडकाठी आणत  आहेत. एम.पी.एस.सीच्या संदर्भात 25 तारखेनंतर निर्णय घेऊ असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

छत्रपती शाहू महाराज उपेक्षितांच्या बाजूने उभे राहिले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य बारा बलुतेदारातुनच निर्माण झाले म्हणून आम्हाला छत्रपतींचा अभिमान आहे, मात्र आधी आमचं मिळावं असं जर कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी खासदार छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचे नाव न घेता मारला.

ओबीसी ओबीसीच नाहीत अशी याचिका सराटे बाबा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. म्हणजे मालक घराबाहेर आणि बाहेरचे घरात अशातला हा प्रकार आहे. ओबीसी समाज हा विखुरलेला आहे, आजही म्हणावा तसा तो जागरूक नाही. समाज एक झाल्याशिवाय ओबीसींना भवितव्य नाही आणि  पुढची पिढी बरबाद होण्याची भीती आहे. कोरोना काळात नाभिक समाजात 15 आत्महत्या घडल्या. मुख्यमंत्र्यांनी एक लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे.     

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान ओबीसीचे नेते बाळासाहेब सानप यांनी भूषवले, लक्ष्मण हाके, बालाजी शिंदे, बी. डी चव्हाण, साधना राठोड, कल्याण दळे, सोमनाथ काशीद , अशोक सोनवणे, अंबादास पंधाडे, अंबादास गारुडकर, बाळासाहेब भुजबळ, अरुण खरमाटे आदिंची यावेळी भाषणे झाली. 

सर्वांनी एकत्र आले पाहिजे

सरकारमध्ये ओबीसींचे प्रश्‍न आपण मांडतो, मात्र संघटनेच्या व्यासपीठावरही ते मांडले पाहिजेत. या चळवळीत तुम्ही एकत्र आले पाहिजे असा सवाल उपस्थित करुन ओबीसी चळवळीला उद्देशून ते म्हणाले, कोणी नेतृत्वासाठी, कोणी जातीसाठी असं राजकारण होता कामा नये. 382 जाती उपेक्षित आहेत, त्या सर्व जातीच्या शक्तींची गरज असून तलवारीची गरज नाही.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !