श्री घोडेश्वरी देवीच्या दागिन्यांचा शोध लागला का?

अहमदनगर - घोडेगाव (ता. नेवासे) येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या दागिने चोरी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीची पोलिस कोठडीची मुदत आज संपत आहे. त्यामुळे त्याला पुन्हा कोर्टापुढे सादर केले जाणार आहे. भास्कर खेमाजी पथवे (वय ४५, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) असे या आरोपीचे नाव आहे.


दि. १९ नोव्हेंबर रोजी घोडेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांची चांदी चोरुन नेली होती. चोरट्यांचा शोध लागत नसल्यामुळे ग्रामस्थांनी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी नगर-औरंगाबाद महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते. पण पोलिसांनी तेव्हा तपासाकरिता आणखी मुदत हवी असल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मंदिरातील चोरीचा गुन्हा करण्याच्या पद्धतीवरुन भास्कर पथवे याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे त्याला सोनई पोलिसांनी अटक करुन नेवासे सत्र न्यायालयात हजर केले. या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता आपल्याला काहीच माहित नसल्याचे पथवे सांगत होता, पण, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचा दाट संशय आहे, असे पोलिसांचे म्हणणे होते.

पथवेला न्यायालयाने ५ दिवसांची कोठडी सुनावली होती. या पोलिस कोठडीची मुदत आता संपली आहे. त्याला आज पुन्हा कोर्टापुढे सादर केले जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

कोण आहे 'भास्कर पथवे' ?

भास्कर पथवे हा चोरी करणारा सराईत गुन्हेगार आहे. तो मंदीरात चोऱ्या करण्यात सराईत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने निघोज येथील मळगंगा देवीच्या मंदिरात चोरी केली होती. तसेच राहाता येथील वीरभद्र मंदिरातील चांदीचे कासव आणि पत्रा चोरुन नेला होता. तर लोणी येथील म्हसोबाच्या मंदिरातील दानपेटी फोडून ५०० रुपये चोरुन नेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मग दागिने चोरले कोणी ?

पोलिसांनी संशयित आरोपी भास्कर पथवे याच्याकडे घोडेश्वरी देवी मंदिरातील चोरीप्रकरणी चौकशी केली असता 'घोडेगावचा गुन्हा मी केलेला नाही, या भागात मी कधी फिरकलेलो नाही', असे तो पोलिसांना सांगत आहे. परंतु, त्याचा पूर्वेतिहास पाहता तो मंदिरातील चोरी करण्याच्या गुन्ह्यात सराईत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

देवीचे दागिने कोठे गेले ? 

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीनेच घोडेश्वरी देवीचे दागिने चोरले की नाही, हे आज स्पष्ट होणार आहे. तसेच हे दागिने कोठे आहेत, हेही समोर येईल. दरम्यान, जर दागिन्यांचा शोध लागला नसेल तर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा नगर औरंगाबाद महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा दिलेला आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !