शेवगाव नगरपरिषद निवडणूक
इच्छुकांची मांदियाळी, पक्ष तिकिटासाठी धावाधाव
शेवगाव : नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे तिकीट मिळविण्यासाठी विद्यमान नगरसेवक व मागील निवडणुकीतील 'सेकंड रनर' उमेदवार आणि तिसऱ्या स्थानावरील उमेदवारास इतर इच्छुक उमेदवारांमध्ये चालू असलेल्या रस्सीखेची मुळे गोंधळ उडाला आहे.
राष्ट्रवादी, भाजप, कांग्रेस, शिवसेना आदी प्रमुख पक्षांचे तिकीट मिळविण्यासाठी ही सर्वच मंडळी संबंधित पक्षश्रेष्ठींच्या दरबारात मुजरा ठोकत आहेत. यात कोण बाजी मारेल हे चित्र लवकरच स्पष्ट होईल मात्र तोपर्यंत वॉर्डात गोंधळ आणि पक्षश्रेष्ठींना मुजरा, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
कार्यकर्ते हवालदिल
नेतेमंडळी आपल्या सेटिंगमध्ये व्यस्त आहेत, मात्र कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. कोणाला पक्षाचे तिकीट मिळेल आणि आपल्या वॉर्डातून कोण उभे राहिल हे ठरायला तयार नाही. अनेक इच्छूक असल्याने कोणाचा प्रचार करावा या संभ्रमात कार्यकर्ते पडले आहेत.
पक्षाच्या तिकिटासाठी दमछाक
राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांचे तिकीट आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच विद्यमान आणि इच्छुकांमध्ये चुरस सुरू आहे. स्वपक्षातील श्रेष्ठींकडे तिकिटासाठी चर्चेद्वारे संवाद सुरू ठेऊन दुसऱ्या पक्षाचे तिकीट मिळल का, यासाठी काहींनी फिल्डींग लावली आहे. ही किमया साधण्यासाठी इतर पक्षातील सलोख्याचे सबंध असणाऱ्या मित्राकडून आपली मागणी तेथील नेत्यांपर्यंत पोहचविण्याचे कसब काही मंडळी पणाला लावत आहे.
नगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग
रोटेशन पद्धतीने आरक्षण फिरवले जात असल्याने नगराध्यक्ष पदाची माळ यंदा ओबीसी उमेदवाराच्या गळ्यात पडणार आहे. ही शक्यता लक्षात घेऊन आपल्याच पक्षाला नगराध्यक्षपदाचा मान मिळावा यासाठी तिकीट वाटपात बारकाईने दक्षता घेतली जातेय. याशिवाय स्थानिक प्रस्थापितांनीही तशी फिल्डींग लावली आहे. त्यासाठी आपले ओबीसी कार्ड बाहेर काढण्याच्या तयारीत मातब्बर दिसत आहेत.