अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या खून प्रकरणातील फरार संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आता बोठेबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनाच आवाहन केले आहे.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की, आरोपी बोठे याच्या घरी व ऑफिसमध्ये पोलिसांनी झडती घेतली आहे. याठिकाणी काही पुरावे मिळाले आहेत. पण फरार असलेला आरोपी बोठे सापडत नाही. त्याला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
लवकरात लवकर त्याला अटक करु, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र नागरिकांना देखील आवाहन आहे की, याबाबत कुठलीही माहिती कोणाकडे असेल, तर पोलिसांना द्या. या संदर्भातील माहिती सांगणार्यांची नावाची पूर्ण गोपनीयता राखली जाईल.
नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाट येथे दि. 30 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात अद्याप पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा मात्र फरार झालेला आहे.
त्याच्या वतीने न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे, पण त्यावर निर्णय झालेला नाही. पोलिसांनी या अर्जाच्या सुनावणीच्या वेळी बोठे याने न्यायालयात उपस्थित राहावे, अशी मागणी केली आहे.