दीपस्तंभ पुरस्काराचे वितरण
अहमदनगर - समाज बिघडला तर व्यवस्था बिघडते. व्यवस्थेला दोष देण्याची प्रवृत्ती म्हणजेच मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. मनुष्य हा सुरक्षित राहण्यासाठी प्राण्याच्या कळपातून बाहेर पडला व मानवीहक्काचे संरक्षण करु लागला. सध्या व्यवस्थेला मदत करण्याऐवजी तिला दोष देण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच मानवी हक्काचे उल्लंघन म्हणावे लागेल, असे प्रतिपादन पदमश्री पोपटराव पवार यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिम्मित्ताने कोरोना काळात मानवाधिकार संरक्षणासाठी महत्वपूर्ण भूमिका घेवून दीपस्तंभासारखे उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना मानवाधिकार अभियानामार्फत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हा समारंभ सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयात पार पडला.
जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, भिंगार भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणारे भिंगार छावणी परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, मनपा कम्युनिटी किचन सुरू करणारे पाणी पुरवठा अधिकारी परिमल निकम, यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.
तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योगदान देणारे खातगाव टाकळीचे उपसरपंच ज्ञानेश्वर पठारे तसेच आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय योगदनाबद्दल बुथ हॉस्पिटलचे प्रशासक देवदान कळकुंबे यांना विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मानवाधिकार अभियानचे प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, संध्या मेढे, सॅम्युअल वाघमारे, अनिल गंगावणे, योगेश तुपविहीरे, विठ्ठल कोतकर, जालिंदर बोरुडे, गणेश ननावरे, संजय कांबळे, दिपक पुरी, प्रकाश पाचारणे, राजेंद्र सातपुते, आशा हरे, दिपक अमृत, दिपक गायकवाड, हर्षल कांबळे, विवेक भिंगारदिवे, अविनाश भोसले, किरण दाभाडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना हे संकट मनुष्यसेवेची संधी म्हणून आली होती. अनेकांनी या संधीद्वारे मनुष्यसेवा केली. पैशाने व उच्च शिक्षण घेऊन जग बदलत नाही. अंतर्मनाची, संस्काराची व मायेची जोड मिळाल्यास समाजात परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी संध्या मेढे यांनी संविधान प्रास्ताविक वाचन केले.
मानवाधिकार अभियानचे प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. तर आभार दक्षिण जिल्हाध्यक्ष गंगावणे यांनी मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.