अहमदनगर - जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान सन 20-21 या निमित्ताने ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्या पंचायत समितीस्तरीय कार्यशाळेच्या आयोजन गुरुवारी केले होते. याचे औचित्य साधून बाल कल्याण समिती, स्नेहालय व चाईल्ड लाईनच्या वतीने श्रीगोंदा, नेवासा आणि पाथर्डी येथील पंचायत समितीचे सभपती, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आणि अंगणवाडी ताई यांना उडान बालविवाह प्रतिबंध अभियानाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
बालविवाह प्रतिबंध कायदा 2006, बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम, ग्रामीण स्तरावर उपाय योजना, बालविवाह होऊ नये म्हणून जनजागृती करण्यात आली.
बालविवाहाची माहिती मिळाल्यास ग्रामसेवक व अंगणवाडी ताई यांनी होत असलेला बालविवाह रोखण्यासाठी कोणकोणत्या यंत्रणांसोबत काम करायचे आहे, याची सविस्तर सादरीकरण करून माहिती देण्यात आली.
तसेच झालेल्या किंवा होत असलेल्या बालविवाह रोखल्यानंतर बालिका व मुलाच्या दोन्ही पालकास संपूर्ण कागदपत्रासोबत बाल कल्याण समिती अहमदनगर समोर हजर करणे बंधनकारक आहे, असे सांगण्यात आले. तसेच बालकांचे हक्क व अधिकार संदर्भात जनजागृती करण्यात आली.
उडान बालविवाह प्रतिबंध अभियान या एक दिवसीय कार्यशाळा अहमदनगर जिल्ह्यातील आगडगाव, नेवासा, पाथर्डी, बनपिंपरी, कोळगाव व भानगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा होण्यासाठी स्नेहालय व चाइल्डलाईनच्या सदस्यांनी माहिती दिली.
सदस्य शुभांगी माने, दिपाली बुरूडे, प्रविण कदम, राहुल कांबळे, महेश सूर्यवंशी, अब्दुल खान, शाहिद शेख, पूजा पोपळघट, राहुल पगारे, विशाल अहिरे यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून बाल कल्याण समिती व चाईल्ड लाईन 1098 ची माहिती पंचायत समितीचे सभापती, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व तालुका सुपरवायझर अशा ६०० लोकांपर्यंत पोहचविली.
यावेळी बालविवाह रोखण्यासाठी ज्या ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, सरपंच यांनी विशेष प्रयत्न केले, अशा दक्ष बालप्रेमिंचे, बाल कल्याण समिती व चाईल्ड लाईनच्या वतीने विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, श्रीगोंदा पंचायत समितीचे उपसभापती रजनी देशमुख, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, कलगुंडे एन. एस, अनिल शिंदे, गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांनी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले.