अहमदनगर - चाईल्डलाईनला एका दिवसात तीन बालविवाह थांबवण्यात यश आले आहे. यापैकी एक बालविवाह चक्क 'सरपंचा'च्या मुलाचा होता. सरपंचाने या लग्नाची निमंत्रण पत्रिका छापून त्याचे वितरण करुन जय्यत तयारी केलेली होती. पण तत्पूर्वीच हा विवाह थांबवण्यात आला.
दिवाळी झाली की तुलसी विवाह दणक्यात झाल्यानंतर लगेचच लग्नसराईची लगबग घराघरांमध्ये सुरू झाली आहे. कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली, तरीही हि लोक आपल्या जमिनी विकून किंवा कर्ज करून आपल्या आहे त्या मुला मुलींचे लग्न करून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतानाचे चित्र सध्याला पाहायला मिळत आहे.
मागील आठ ते दहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात 'बाल कल्याण समिती व चाइल्डलाइन'ने कोरोना काळात ७२ पेक्षा जास्त बालविवाहाच्या केसेसमध्ये हस्तक्षेप करून बालविवाह रोखले आहे . जे बालविवाह झाले आहेत, अशा वराडी मंडळावर ६ गुन्हे दाखल केले आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यामध्ये अद्यापही बालविवाह पूर्णपणे बंद झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
चाईल्डलाईनला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी स्थानिक प्रशासनाची मदत घेत पाथर्डी तालुक्यात एक बालविवाह रोखला. त्यावेळी लक्षात आलेली धक्कादायक बाब म्हणजे हा विवाह चक्क सरपंचाच्याच मुलाचा होता. शिवाय त्याने या विवाहाची लग्नपत्रिका छापून आप्तेष्टांना वाटल्या देखील होत्या.
शिवाय या बालविवाहला वधु-वराना आशीर्वाद देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि काही अध्यात्मिक महाराज देखील येणार असल्याचे लग्नपत्रिकेत नमूद केलेले होते. पण चाईल्डलाईनच्या हस्तक्षेपामुळे हा संभाव्य बालविवाह थांबवण्यात यश आले. सरपंचाने मुलाचे वय एकवीस वर्षे झाल्यानंतरच त्याचा विवाह करून देईन, अशी लेखी स्वरूपात ग्वाही दिली आहे.