नवी दिल्ली - भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची गुरुवारी भारतीय सिनियर क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) ॲबी कुरुविला व देबाशिष मोहंती यांची ५ सदस्यांच्या समितीत निवड केली आहे.
बीसीसीआयच्या शुक्रवारी झालेल्या ८९ व्या आमसभेनंतर या समितीची निवड जाहीर झाली. या निवड समितीमध्ये माजी भारतीय खेळाडू सुनील जोशी व हरविंदर सिंग यांचाही समावेश आहे. शर्मा यांनी ११ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २३ कसोटी व ६५ वन-डे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
सन १९८७ च्या विश्वकप स्पर्धेत त्यांनी घेतलेली हॅट् ट्रिक त्यांच्या कारकिर्दीतील ठळक वैशिष्ट्य आहे. वयाच्या १६ व्या वर्षी शर्मा यांनी हरयाणातर्फे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला तर वयाच्या १८ व्या वर्षी कसोटी पदार्पण केले.
त्यापूर्वी त्यांनी डिसेंबर १९८३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यात पदार्पण केले होते. बीसीसीआयच्या घटनेनुसार ज्या सदस्याला अधिक कसोटी सामने खेळण्याचा अनुभव असतो, तो निवड समितीचा अध्यक्ष असतो.