नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. १६ डिसेंबर) दुपारी फेटाळला आहे.
जरे यांच्या हत्याकांडात नाव आल्यापासून फरार असलेल्या बोठे याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याला विरोध करताना पोलिसांनी सुनावणीच्या वेळी बोठे याला समक्ष हजर राहण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळली होती.
त्यानंतर बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. आरोपीतर्फे वकिलांनी युक्तिवाद केला होता की, या प्रकरणात द्वेषातून बोठे याचे नाव घेतलेले आहे. तसेच त्यांचा हत्याकांडाशी काहीही संबंध नाही.
पण सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी बाजू मांडताना या प्रकरणात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत, असे सांगितले. बोठे आणि आरोपींचे मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि लेखी पुरावे असल्याचे त्यांनी न्यायालयात नमूद केले होते.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. तो बुधवारी दुपारी सुनावण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी बोठे याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यामुळे सध्या फरार असलेल्या बोठेला दिलासा मिळाला नाही.