नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या तथा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा असलेल्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे अजूनही फरारच आहे. त्याच्या वतीने नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे.
रेखा जरे यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार बाळ बोठे हाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस बोठे याला पकडायला त्याच्या घरी गेले होते. परंतु पोलिसांची कुणकुण लागल्यामुळे बोठे घरातून पसार झाला. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पाच तपास पथके रवाना केली आहेत.
दरम्यान, बाळ बोठे याच्या वतीने सोमवारी दुपारी नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
चौघांच्या पोलिस कोठडीत वाढ
रेखा जरे यांच्या हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे त्यांना दुपारी पुन्हा पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. मधल्या काळात त्यांच्याकडून बरीच माहिती, पुरावे, गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, सुपारीची रक्कम आणि अन्य पुरावे संकलित केलेले आहेत. सोमवारी त्यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे.