श्री घोडेश्वरी देवीचे दागिने चोरी प्रकरण
अहमदनगर - घोडेगाव (ता. नेवासे) येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या दागिने चोरी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीला न्यायालयाने ५ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. भास्कर खेमाजी पथवे (वय ४५, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी लोणी, पारनेर, राहाता येथे मंदिरात चोरी केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे.
दि. १९ नोव्हेंबर रोजी घोडेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी नक्षीकाम केलेली सुमारे साडेपाच लाख रुपयांची चांदी चोरुन नेली होती. त्यांनतर पंधरा दिवस होत आले तरी चोरट्यांचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. १ डिसेंबर) सकाळी नगर-औरंगाबाद महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.
हा तपास सोनई पोलिसांसाठी आव्हानात्मक होता. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकही समांतर पातळीवर या गुन्ह्याचा तपास करत होते. गुन्हे शाखेच्या पथकातील अनुभवी पोलिस कर्मचारी सुनिल चव्हाण यांना मंदिरातील चोरीच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीवरुन भास्कर पथवे याच्यावर संशय बळावला. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा त्याला पकडून सोनई पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांनी पथवे याला अटक करुन मंगळवारी दुपारी अडीच वाजता नेवासे सत्र न्यायालयात हजर केले. या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता आपल्याला काहीच माहित नसल्याचे पथवे सांगत आहे, पण, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे अधिक चाैकशी करणे गरजेचे आहे, असे तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे न्यायालयात म्हणाले.
म्हणून मिळाली पोलिस कोठडी
गुन्ह्यात चोरी गेलेला माल हस्तगत करायचा आहे, या गुन्ह्यात आणखी कोण कोण सहभागी आहे याची चौकशी करायची आहे, इतर आरोपींना अटक करायची आहे, गुन्ह्यात वापरलेले स्क्रु ड्रायव्हर व पक्कड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पण पळून जाण्यासाठी कोणते वाहन वापरले, ते शाेधून जप्त करायचे आहे, तसेच त्याने आधी येऊन मंदिराची पाहणी केली होती का, याबाबत अधिक तपास करायचा असल्यामुळे पथवेला पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची कोठडी सुनावली.
कोण आहे 'भास्कर पथवे' ?
एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलेला भास्कर पथवे हा चोरी करणारा सराईत गुन्हेगार आहे. तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असला तरी तो मंदीरात चोऱ्या करण्यात सराईत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने निघोज येथील मळगंगा देवीच्या मंदिरात चोरी केली होती. तसेच राहाता येथील वीरभद्र मंदिरातील चांदीचे कासव आणि पत्रा चोरुन नेला होता. तर लोणी येथील म्हसोबाच्या मंदिरातील दानपेटी फोडून ५०० रुपये चोरुन नेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
'तो' मी नव्हेच ?
संशयित आरोपी भास्कर याला शोधण्यासाठी पोलिस गेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडे घोडेश्वरी देवी मंदिरातील चोरीप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता 'घोडेगावचा गुन्हा मी केलेला नाही, या भागात मी कधी फिरकलेलो नाही', असे तो पोलिसांना सांगत आहे. परंतु, त्याचा पूर्वेतिहास पाहता तो मंदिरातील चोरी करण्याच्या गुन्ह्यात सराईत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.