बोठेचे हितचिंतक आणि काही पोलिस रडारवर
नाशिक - रेखा जरे हत्याकांड मधील प्रमुख सूत्रधार म्हणून उघडकीस आलेला पत्रकार बाळ बोठे याचे गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर येताच तो फरार झाला आहे. त्याला ही माहिती कोणी दिली, तसेच त्याला पळून जाण्यात कोणी मदत केली, याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, रेखा जरे यांचा गळा ज्या शस्त्राने कापला, ते शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे.
पण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेवरून तसेच मार्गदर्शनानुसार या गुन्ह्याच्या तपासाची माहिती अत्यंत गोपनीय ठेवलेली होती. तरीही बोठे याला या गुन्ह्यात त्याचे नाव आले असल्याचे कसे काय माहित झाले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे बोठे याला कोणीतरी ही माहिती देऊन सहज पळून जाण्यास मदत केली असल्याची दाट शक्यता आहे.
पोलिसांच्या गोपनीय तपासाची माहिती बोठे याला कोणी दिली, तसेच त्याला पळून जाण्यास कोणी मदत केली, याचाही पोलीस कसून शोध घेत आहेत. बोठे याचे जप्त केलेले दोन्ही मोबाईल पोलीस तपासून पाहत आहेत. यामध्ये काही महत्त्वाचा धागादोरा अथवा पुरावा गवसतो का, याची शहानिशा पोलिस करत आहेत.
त्यांची गय करणार नाही...
रेखा जरे यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला त्यावेळी बोठे तिथे उपस्थित होता. दुसऱ्या दिवशी जरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना, त्यानंतर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करताना बोठे उपस्थित होता. परंतु सागर भिंगारदिवे याला अटक झाली आहे आणि त्याने या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे हाच आहे, अशी माहिती पोलिसांना दिल्याचे समजताच बोठे फरार झाला. त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी म्हटले आहे.