फरार बोठेची 'ट्रॅव्हल हिस्टरी' तपासली

रेखा जरे हत्याकांड - जप्त पासपोर्टचा केला अभ्यास, 

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिला बालविकास अधिकारी विजयामाला माने यांनी सांगितली 'ती' घटना

नाशिक : रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा पासपोर्ट पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केला होता. त्याने आतापर्यंत कोठे-कोठे प्रवास केला आहे, याची तपासणी पोलिसांनी केली आहे. पासपोर्टवर असलेले शिक्के तपासून बोठेची आतापर्यंतची ट्रॅव्हल हिस्टरी तपासली गेली आहे. तसेच रेखा जरे यांच्या सोबत घटनेवेळी गाडीत असलेल्या महिला बालविकास अधिकारी विजयमाला माने यांचा जबाब आज पोलिसांनी घेतला.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे या कारमधून येत असताना जातेगाव घाट शिवार येथे महामार्गावर त्यांच्यावर दोघांनी सशस्त्र हल्ला केला होता. हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं? हा संपूर्ण घटनाक्रम त्यांच्यासोबत कारमध्ये असलेल्या महिला बालविकास अधिकारी विजयमाला माने यांनी सांगितला. हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. आम्ही पुण्यावरून येताना जातेगाव घाटात येथे आमच्या कारसमोर दोघांनी दुचाकी आडवी घातली. कट का मारला? अशी विचारणा करत जरे यांच्याशी ते दोघे वाद घालायला लागले. 

त्यांनी जरे यांना मागे ढकलले आणि वार केले. जरे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. जरे यांना त्यांच्या मुलाने व मी कारमधील दुसऱ्या सीटवर शिफ्ट केले व मी कार चालवत गाडी सुपा टोल नाक्यावर आणली. तेथे रुग्णवाहिकेत जरे यांना शिफ्ट करून जिल्हा रुग्णालयात आणले. हा घटनाक्रम सांगताना माने यांचे डोळे पाणावले. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे पसार आहे. रेखा जरे यांची हत्या करण्यासाठी धारदार चाकू वापरण्यात आला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

माझ्या जीवाला धोका, संरक्षण द्या

या घटनेने आपल्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे. म्हणून मी फोन बंद ठेवले होते. माझी आईदेखील घाबरली होती. मी फरार झाले नाही. मी महिला व बालविकास अधिकारी आहे. मी अनेक महिलांना व बालकांना न्याय देते. पण या घटनेनंतर मला भीती वाटत असल्याने मी पोलीस संरक्षण मिळावे अशी विनंती करणार आहे, असे विजयमाला माने यांनी सांगितले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !