रेखा जरे खून प्रकरण : मुख्य सूत्रधार बाळ बोठेच, पोलीस अधीक्षक पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
नाशिक: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा अहमदनगरमधील पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे असून, यातील आणखी एका आरोपीच्या मदतीने सुपारी देऊन बोठे यानेच थंड डोक्याने प्लॅन रचत ही हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बोठे फरारी असून त्याच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. त्याच्या सावेडी येथील घराची झडती घेतली असून, काही वस्तू देखील जप्त करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. फरार बोठेने रेखा जरेचा खून करण्याची सुपारी देण्यामागे काय गंभीर कारण होते याचीच चर्चा सध्या सुरू असून बोठे ला ताब्यात घेतल्या नंतर या वरील पडदा उठेल, असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रेखा जरे हत्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी अटक केलेल्या तीन आरोपींच्या चौकशीत सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार यांची नावे समोर आली. या दोघांनाही पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. या पाच जणांकडे चौकशी केल्यानंतर पत्रकार बोठे यानेच जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पुरावे पोलीस तपासात समोर आले आहेत. पोलिसांनी तातडीने बोठे यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली असून लवकरच आरोपीला ताब्यात घेऊ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी मुख्यसूत्रधार बोठे व भिंगारदिवे यांनी मिळून दिलेली सुपारीची रक्कम ६ लाख २० हजार रूपये जप्त केली आहे, असेही पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी पुष्कळ तांत्रिक माहिती हाती आली असून त्यानुसार तपासाची चक्रे फिरवली जात असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
बोठे हातातून निसटलाच कसा?
जरे खून प्रकरणात पोलिसांनी अथक कष्ट घेऊन प्रयत्नांची पराकाष्टा करत राहुरी, श्रीरामपूर, राहाता परिसराशी कोल्हापूर येथून पाच आरोपींना घटनेच्या काही तासात मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. एकूणच पोलिसांनी या तपासात कमालीची गुप्तता पाळल्याचे दिसून येतेय. तरी देखील मुख्य सूत्रधार बोठे नगर शहरात असतानाही पोलिसांच्या हातून निसटलाच कसा, हा चर्चेचा विषय बनला आहे.
कोण आहे बोठे?
राज्यातील एका आघाडीच्या दैनिकाच्या अहमदनगर आवृत्तीत आरोपी बाळ बोठे संपादक म्हणून कार्यरत आहे. पत्रकार म्हणून वावरताना तो अनेक राजकीय, प्रशासकीय लोकांच्या संपर्कात असे. ही पत्रकारितेची कारकिर्दही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली.
अपघाती हत्येचा डाव फसला
रेखा जरे यांची हत्या करण्याचा कट रचनाऱ्या मुख्य सूत्रधार बोठे ने या आधी २४ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती. मात्र, त्या दिवशी अपघात दाखवून जरे यांचा खून करण्याचा आरोपींचा डाव फसला. याला पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
पोलिस 'त्या' पिस्तूलाच्या शोधात
सरकारी परवाना असलेले पिस्तुल आरोपी बाळ बोठे कडे असून त्याचा आरोपिकडून गैरवापर होऊ नये म्हणून पोलीस त्या पिस्तूलाचाही शोध घेत असल्याबाबतही पाटील यांनी दुजोरा दिला आहे. बोठे च्या घरावर छापा टाकून पोलिसांनी काही वस्तू देखील जप्त केल्या आहेत. एखादया गंभीर गुन्ह्यात आरोपीचा सहभाग आढळल्यास त्याच्याकडील पिस्तूलाचा परवाना तात्काळ रद्द केला जावा, असा कायदेशीर शिरस्ता आहे.