'त्या' मनोविकलांग मातेला 'मानवसेवा'त मायेचा आधार

अहमदनगर - शहरातील तारकपुर परिसरात आठ दिवसांपासून एक निराधार मानसिक विकलांग महिला (अंदाजित वय ३५ वर्ष) फिरताना सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई मेढे यांच्या नजरेस पडली. त्यांनी याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती देऊन पोलिसांच्या मदतीने या महिलेचे पुनर्वसन अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित 'मानवसेवा' प्रकल्पात केले.


या निराधार मातेला आधार मिळण्याकरता संध्याताई यांनी अरणगाव येथे मनोरुग्णांना जगण्याची नवी उर्मी देणारे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या 'मानवसेवा' प्रकल्पाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना कळवले. दिलीप गुंजाळ स्वयंसेवकांसह तारकपुर परिसरात पोहचले आणि पिडीत महिलेशी चर्चा केली. 

दररोजच्या वेदना सहन करुन मिळेल ते खाऊन जगणं..! सर्व भान हरवून बसलेल्या या मातेला वैयक्तिक स्वच्छतेचे भान नव्हतं. काही दुकानांच्या पायरीवर रात्र काढतांना माणसांकडून दररोजचं शोषणही व्हायचं. हे ऐकून काळजात चर्रर्र.. झालं. दिलीप गुंजाळ व संध्याताई मेढे यांनी लागलीच या सर्व परिस्थितीची माहिती तोफखाना पोलीस स्टेशनला दिली. 

या निराधार मातेचं दु:ख जाणून घेवून दिलीप गुंजाळ, अनिता मदणे, विकास बर्डे, ऋतिक बर्डे यांनी निराधार मनोरुग्ण मातेला 'मानवसेवा' प्रकल्पात दाखल करीत मायेचा आधार दिला. अखेर या मातेच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटला.  मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. 

मानवसेवा प्रकल्पामुळे या निराधार मातेच्या आयुष्याची नवी वाट निर्माण झाली आहे. मी फक्त सामाजिक जाणिवेतून या महिलेच्या वेदना जाणून मदतीला धावले, अशा भावना सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई मेढे यांनी व्यक्त केल्या आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !