मुंबई - कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, केंद्राच्या सूचनेनुसार योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते .याप्रसंगी नीती आयोगाने देखील येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मार्गदर्शन केले.
एकीकडे आम्ही कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करीत आहेत, त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व कोरोना लाटेला आमंत्रण मिळू शकते याकडेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.