विविध क्षेत्रात काम करीत असताना आपल्याला आयुष्यात खूप मोठी, व्यापक दृष्टी असलेली, निर्मळ मनाची माणसे भेटत असतात. त्यांच्या या स्वभावाने आपण काही ना काही चांगले शिकत असतो. मग ते साहित्य, राजकीय, क्रीडा क्षेत्र असो की सांस्कृतिक..
स्वतःची जबाबदारी, समाजाचं हित, चांगलं घडावं, निर्माण व्हावं, यासाठी आपलं योगदान देत समाजाला सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील असलेली ही माणसे दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत.
समाज घडवायचा... हे शब्द भाषणं करताना अनेकदा वक्त्यांमधे येत असतो. पण कृतिशील कार्य करून दिशा देणारी माणसे ही आपल्या श्रद्धा स्थानी हवीत.. नाहीतर खुज्या मनाची पणं मोठ्या खुर्चीवर बसलेली लोकं आपल्याला पावलोपावली दिसत असतात...
बऱ्याचदा आपल्याला अनुभव येत असतो की, अरे तो आपला माणूस आहे.. जवळचा आहे.. गावचा आहे.. भाऊबंद आहे.. जातवाला आहे...
पण असा छोटा विचार करुन इतरांना दुय्यम दर्जा देत आपली माणसे सांभाळायची.. संधी मिळाली की एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला दाबून, त्याच्यावर अन्याय करुन, आपल्या माणसाला संस्थेवर आणून बसवायचं.. आणि आपली पकड घट्ट करायची.. म्हणजे खूप काही कमावलं असा होत नाही..
अशी माणसे आपल्या कोंदट वृत्तीने स्वताच्या स्वार्थापायी संस्थेचा गळा घोटत असतात. पूर्वीच्या लोकांनी ज्या दृष्टीकोनातून समाजाच्या हितासाठी, समाज घडविण्यासाठी व्यापक हित लक्षात घेत संस्था स्थापन करुन क्रांती केलेली असते. प्रकाशाची कोवळी किरणे दूरवर पोचवलेली असतात.. त्याला हरताळ फासत, लोभापायी त्या क्षेत्राचा उद्देश संपवत असतात..
अन् हीच माणसे समाजाचा वर्तमान, भविष्य अंधारात ढकलण्याचं कुकर्म करीत असतात.. ज्यांना सार्वजनिक जीवनात आपल स्थान निर्माण करायचं आहे, काही चांगल घडवायचं आहे.. त्यांनी, हा माझा माणूस, आपला माणूस.. जातवाला आहे, गणगोतातला आहे, असा छोटा विचार करण सोडूनच द्यायला हवं..
अशा प्रवृत्तीच्या लोकांना सार्वजनिक क्षेत्रात तर फिरकु सुद्धा देऊ नये.. हद्दपार करावं.. चांगल्या कार्यकर्त्यांना डोहात फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा प्रवृत्ती या समाजासाठी, संस्थेसाठी..
घातकच असतात.
- जयंत येलुलकर (अहमदनगर)