अहमदनगर - नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरात गुरुवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी देवीच्या मंदिरातील गाभार्याचे कुलूप स्क्रु ड्रायव्हर आणि पक्कडने तोडून १७ किलो चांदी व त्यावरील हिरे चोरून नेले. एकूण ११ लाख रुपयांची चोरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुरुवारी पहाटे चार वाजता मंदिरात काही महिला काकड आरती करण्यासाठी आल्या असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. ही बाब समजताच मंदिराचे पुजारी, सरपंच राजेंद्र देसरडा, पोलिस पाटील भगत वैरागर आणि गावकऱ्यांनी मंदिरात धाव घेतली. चोरट्यांनी दक्षीण बाजूने मंदिराच्या संरक्षक भिंतीवरून आत प्रवेश केला. नंतर स्क्रु द्रायव्हर व पक्कडने गाभार्याचे कुलूप तोडले आणि गाभाऱ्यात लावलेले १७ किलो चांदीचे मखर व हिरे उचकटून चोरून नेले.
गुरुवारी सकाळी सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली. मंदिर गाभाऱ्यात ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तसेच श्वान पथक देखील दाखल झाले होते. श्वान पथकाने मिरी रोडच्या दिशेने चोरट्यांचा माग काढला.
काही वेळाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांच्या मोडस ऑपरेंडीचा अंदाज लावत तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, याप्रकरणी मंदिराच्या पुजार्याने दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सोनई पोलिस कसून तपास करत आहेत.
नाहीतर गाव बंद ठेवणार
घोडेगावचे ग्रामदैवत श्री घोडेश्वरी माता मंदिरात धाडसी चोरी झाल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. गावकऱ्यांनी करोडो रुपयांच्या लोकवर्गणीतून देवी मंदिराचे भव्य काम केले आहे. मागील वर्षीच मंदिराचे काम पूर्ण झाले होते. या गुन्ह्याचा लवकर तपास करून चोरट्यांना अटक केली नाही तर गाव बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सीसीटीव्ही बंद, डिव्हीआर गायब
घोडेश्वरी देवीच्या मंदिरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद आहेत. तसेच डीव्हीआर यंत्रणा गायब आहे. सीसीटीव्ही कॅमेरे जर सुरू असते तर लाखो रुपयांची चोरी करणारे चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले असते. त्यामुळे मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या हलगर्जीपणा बद्दल ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.