शांततापूर्ण मार्गाने नगर-औरंगाबाद महामार्ग अडवणार
अहमदनगर - घोडेगाव (ता. नेवासा) येथील श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरातून चांदीचे दागिने नेणाऱ्या चोरट्यांचा आठवडा झाला तरी तपास लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आता निर्णायक भूमिका घेतली आहे. चोरट्यांचा तपास लागावा, चोरलेले दागिने परत मिळावेत, या मागणीसाठी मंगळवारी (दि. १ डिसेंबर रोजी) सकाळी १० वाजता नगर - औरंगाबाद राज्य महामार्गावर 'रस्ता रोको आंदोलन' करण्यात येणार आहे. तसेच स्वयंस्फूर्तीने 'गाव बंद' ठेवले जाणार आहे. तसे लेखी निवेदन सोनई पोलिसांना देण्यात आले आहे.
दि. १९ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभार्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेला एक आठवडा झाला तरी अजून चोरट्यांचा तपास लागलेला नाही, किंवा पोलिसांना याप्रकरणी कुठलेही धागे-दोरे अजून गवसलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ आता संतप्त झाले आहेत.
ही चोरीची घटना म्हणजे ग्रामस्थांच्या भावनेचा व श्रद्धेचा विषय असल्यामुळे ग्रामस्थ तत्काळ गाव बंद ठेवून रस्ता रोको आंदोलन करणार होते. पण सोनई पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी शांतता राखून सहकार्य केले. परंतु त्याचवेळी चोरट्यांचा शोध लागला नाही तर गावात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आलेला होता.
मात्र अजूनही चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा न झाल्यामुळे शनिवार (दि. २८ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ६ वाजता घोडेश्वरी देवीच्या मंदिरात 'हितगुज बैठक' पार पडली. सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानुसार सर्वधर्मीय ग्रामस्थांनी, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या चर्चेत सहभाग घेतला. संतप्त भावना व्यक्त करत सर्वांनी आता आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
सर्वसंमतीने एकमुखी निर्धार
मंदिरातील चोरीच्या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. पण आठवडा झाला असला तरी अद्याप कोणीही वरीष्ठ अधिकारी गावात फिरकलेले नाहीत. असेच दिवस जात राहिले तर तपासात काही अर्थ राहणार नाही. चोरटे तोपर्यंत मुद्देमाल विकून मोकळे होतील. त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आता रस्ता रोको आंदोलन करायचेच असा सर्वसंमतीने निर्धार करण्यात आला.
मंगळवारी 'रस्ता रोको' आंदोलन
घोडेगाव ग्रामस्थांच्या भावनांकडे व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दिनांक १ डिसेंबर रोजी घोडेगाव चौफुला येथे सर्वधर्मीय ग्रामस्थ व महिला आता आंदोलनाला बसणार आहेत. जोपर्यंत जिल्हाधिकारी अथवा जिल्हा पोलिस अधीक्षक घोडेगावात येऊन ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेत नाहीत, आणखी वेगाने तपास करण्याच्या सूचना देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे ठरले आहे.
पोलिसांना सहकार्य करणार
शनिवारी सायंकाळी हितगुज बैठक संपताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे मंदिरात हजर झाले. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच तपास करण्यासाठी पोलिस दल कसे परिश्रम घेत आहे, याची कल्पना दिली. परंतु, ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले. तसेच तत्काळ पोलिसांना लेखी निवेदन देत 'रस्ता रोको आंदोलना'ची पूर्वकल्पना देण्यात आली.
हेही वाचा
घोडेश्वरी देवीच्या मंदिरात धाडसी चोरी, ११ लाखांचे दागिने पळवले
घोडेश्वरी देवीचे दागिने चोरणाऱ्यांना दोन दिवसांत शोधा, अन्यथा आंदोलन
'घोडेश्वरी देवी'चे दागिने चोरणारे सापडेनात, ठोस भूमिका घेण्यासाठी आज ग्रामस्थांची 'हितगुज बैठक'
.
आमचे फेसबुक पेज लाईक करा
तसेच यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा