मुंबई - कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. याप्रसंगी नीती आयोगाने देखील येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मार्गदर्शन केले. कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक आहे.
लसीची उपलब्धता, लसीची संख्या, लसीचे दुष्परिणाम, लसीचा परिणाम, लसीवरील येणारा खर्च व त्याचे वितरण याबाबतीत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असून त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे. पुढील काळात संक्रमणाची साखळी तोडणे गरजेचे आहे.
5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी दर आणणे गरजेचे आहे. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती वाढविणे आवश्यक आहे. एन्टीजेनचा निगेटिव्ह अहवाल आलेल्या पण लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करून परत आरटीपीसीआर चाचणी करणे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले