अहमदनगर - नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरातून ११ लाखांचे दागिने पळवणाऱ्या चोरट्यांना दोन दिवसांत शोधावे, अन्यथा दोन दिवसांनंतर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच राजेंद्र देसरडा व ग्रामस्थांनी दिला आहे. तसे लेखी निवेदन त्यांनी सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना दिले आहे.
घोडेगाव येथे घोडेश्वरी देवीच्या मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या देवीच्या मूर्तीच्या मागे चांदीच्या पत्र्याचा सुमारे १६ ते १७ किलोचा लेप दिलेला होता. सुमारे ११ लाख रुपये किमतीचे दागिने असलेला हा लेप चोरट्यांनी चाेरुन नेला. त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. घोडेश्वरी माता आमचे ग्रामदैवत असल्यामुळे हा ग्रामस्थांच्या श्रद्धेचा विषय आहे.
काही दिवसांपासून गावात चोरट्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. मध्यंतरी भरवस्तीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच ते सहा ठिकणी घरफोड्या केल्या होत्या. त्याचा तपास लागलेला नाही. त्यामुळेच घोडेगावमध्ये चोऱ्या करण्याचे धाडस पुन्हा पुन्हा वाढत आहे. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. पण अजूनही या चोऱ्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना आहेत.
त्यामुळे घोडेश्वरी देवीच्या मंदिरात चोरी करणाऱ्यांचा दोन दिवसांत शोध घेऊन देवीचे दागिने परत आणावेत, अशी मागणी सरपंच राजेंद्र देसरडा व ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, नंतर जी परिस्थिती उद्भवेल, त्याची जबाबदारी प्रशासनवर राहिल, असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर सरपंच राजेंद्र देसरडा, उपसरपंच सुनिता येळवंडे यांच्यासह पारस चोरडिया, अॅड. स्वप्नील सोनवणे, सचिन चोरडिया, मनोज बोरुडे, विठ्ठल बऱ्हाटे, राजेंद्र येळवंडे, दिलीप काळे, मच्छिंद्र कदम, अलीभाई जुम्माभाई शेख, संजय चेमटे, अशोक दाणे, शरद सोनवणे, निसार सय्यद, रमेश गीते, किशोर सोनवणे, सोमनाथ वैरागर, बबन भोसले, नवनाथ भोसले, अनिल कोरडे, बाळासाहेब वैरागर, बापुराव जाधव, निलेश नहार, शरद दारकुंडे, पंकज लांभाते, उदय जाधव, सचिन देसरडा, यशवंत येळवंडे, संदीप जरे, आदींच्या सह्या आहेत.
हेही वाचा - घोडेश्वरी देवीच्या मंदिरात धाडसी चोरी, ११ लाखांचे दागिने पळवले