अहमदनगर - शहरातील कुख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश राऊत (२९, लाटेगल्ली, माणिकचौक) याला एमपीडीए कायद्यांतर्गत नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याची रवानगी आता नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधिद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळु तस्कर व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम कायद्याअंतर्गत त्याला एका वर्षासाठी स्थानबध्द (अटक) केले आहे.
पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी बंटीच्या विरोधात प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अंतिम निर्णय घेवून बंटी याला एक वर्षासाठी स्थानबध्दतेचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृह केली. राऊतच्या विरुध्द ९ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
धारदार शस्त्र जवळ बाळगणे, दंगा करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दगडफेक करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सशस्त्र दरोडा टाकणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, अग्नीशस्त्र बाळगणे, दुखापत करुन वस्तुची विल्हेवाट लावणे, बदनामी करणे, या कायदा कलमानुसार गुन्हे दाखल आहेत.