नवी दिल्ली - यूपीमध्ये पोलिसांसमोर निर्घृण खून करण्यात आला आहे. दुकानाचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकारी आणि एसडीएमसमोर या तरुणाचा चार गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. यामुळे उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीचे स्वरुप पुन्हा एकदा जगासमोर आले आहे.
ही घटना दुर्जनपूरच्या बैरिया येथे घडली. येथे दोन दुकानांचा वाद सोडवण्यासाठी सीओ चंद्रकेश सिंह, बीडीओ बैरिया गजेंद्र प्रताप सिंह आणि एसडीएम सुरेश पाल हे गेले होते. धीरेंद्र सिंह आणि जयप्रकाश उर्फ गामा पाल यांच्या दुकानाचा वाद सुरू होता. पोलिसांसमोरही हा वाद मिटला नाही.
धीरेंद्रने जयप्रकाशच्या छातीत ४ गोळ्या मारल्या आणि फरार झाला. या घटनेत जयप्रकासचा जागीच मृत्यू झाला. धीरेंद्र बैरियाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंहच्या जवळचा असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसकडून या घटनेचा व्हिडिओ ट्वीट व्हायरल करुन निषेध व्यक्त होत आहे.
ग्रामसभा दुर्जनपूर व हनुमानगंजच्या दोन कोट्यांच्या दुकानांच्या पंचायत भवन येथे बैठक बोलविण्यात आली होती. दुकानांसाठी चार स्वयं सहाय्यता समुहांनी अर्ज केला होता. दुर्जनपूरच्या दुकानांसाठी दोन गटांमध्ये मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. मतदान किंवा इतर ओळखपत्र असलेल्या व्यक्तीलाच मतदान करता येईल, असे पोलिसांनी सांगितले होते.
एका समुहाकडे कोणतेच ओळखपत्र नव्हते, यावरुनच वाद सुरू झाला. लाठ्या-काठ्या आणि दगडफेक करण्यात आली. यादरम्यान एका गटाकडून गोळीबार करण्यात आला. दुर्जनपूरचे जयप्रकाश उर्फ गामा पाल यांना धीरेंद्रने चार गोळ्या मारल्या. या घटनेत जयप्रकाशचा जागीच मृत्यू झाला.