अहमदनगर - मुळा धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग गुरुवारी वाढवला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी ४ वाजता धरणाच्या सर्व ११ दरवाजांतून ३ हजार क्युसेक पाणी मुळा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता २ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता.
गेले दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रांत अतिवृष्टी सुरू आहे. १३ ऑक्टोबरला धरणातून ६०० क्युसेक, १४ ऑक्टोबरला ९०० क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. १ सप्टेंबरला मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते.
दि. १ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत धरणातून नदीपात्रात तब्बल १३ हजार ७७२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. १३ तारखेला सायंकाळपासून पुन्हा धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. गुरुवारी नदीपात्रात २ हजार क्युसेक विसर्ग सुरू होताच नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला.
सायंकाळी धरणातील पाणीसाठा २६ हजार दशलक्ष घनफूट (१०० टक्के) तर धरणाच्या पाणी पातळीची १८१२ ही पूर्ण क्षमतेने नोंद झाली. बुधवारी सुरू झालेला परतीचा पाऊस गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होता. मुळा धरणाच्या ११ दरवाजांतून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.
मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटबंधारे कर्मचारी धरणाच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहेत. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.