खूप वर्षापूर्वी सामुहिक बलात्काराची घटना घडली होती. मुलगी आपल्या प्रियकराबरोबर गावाबाहेर टेकडीवर फिरायला गेली होती. त्यावेळी तिच्यावर सामुहिक बलात्कार झाला. तिच्या मानसिक वेदनांचा विचार न करता तिला हवे तसे प्रश्न विचारण्यात आले. जवळच्या नातेवाईक स्त्रियांनी आता तुझं कौमार्यभंग झालंय तर तुला आता मरण्याशिवाय पर्याय नाही, असे मुर्ख सल्ले दिले. मुळात बलात्काराची घटना का घडते, याचा विचार व्हायला हवा...
यात आधी पुरुषसत्ताक मानसिकता बदलायला हवी. मुलाला लहानपणापासूनच बहिण, आई, वहिनी, मैत्रिण इतर स्त्रियांचा बरोबरीच्या नात्याचा स्विकार करण्याची मानसिकता तयार करायला हवी. लहानपणी घरातील मुलींवर हाेणारी दादागिरी जेव्हा आई बाबा आजोबा आजी हसून पचवतात, तिथे त्या मुलांच्या मनात मी पुरुष आहे मी स्त्रीबरोबर असंच वागायचं असतं', या पुरुषसत्ताक भावनेचा जन्म होतो.
तो मुलगा मग रस्त्यावरील कुत्र्याला क्रुरपणे त्रास देतो. त्याला मारतो. या गोष्टी वाढत जातात. जे कमजोर आहेत, त्यांच्यावर अन्याय करण्याची वृत्ती वाढते. अशा गोष्टींमध्ये त्या मुलांना विकृत आनंद मिळायला लागतो. लहान मुलगा रडू लागला की घरातली लोक त्याला म्हणतात, 'रडायला तु मुलगी आहेस का'? म्हणजे नकळत आपण त्याला व्यक्त होण्याची नैसर्गिक भावना दाबून टाकण्याचे धडे देतो.
अन मग ही लहानपणापासूनच आपल्या पुरुषसत्ताक पध्दतीने वाढीला लावलेली स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे, ही भावना पुरुषांच्या मनात ठाम बसते. लैंगिक सुख हे स्त्रीकडून ओरबाडून घेणं, हा आपला अधिकार किंवा हक्क आहे असं समजून आपली स्त्रीवर सत्ता गाजविण्यासाठी आटापिटा करत असतो. पण स्त्रीच्या शरिरापलीकडे जाऊन तिला माणूस म्हणून पाहिलं जाण्याची गरज आहे.
अलीकडे जोर धरलेली "मी टू" चळवळीत होणारा सेमीबलात्काराला होणाऱ्या विरोधाची संख्या वाढते आहे. मैत्रीत, सहका-यांत, सोबतच्या लोकांवर विश्वास टाकताना घेतला जाणारा गैरफायदा आता लपवून ठेवता येत नाही. केवळ सत्ता आहे, बळ आहे म्हणून स्त्रीला गृहीत धरणं बंद व्हायला हवं.
न्यायप्रक्रिया जलद असायला हवी. निकाल, शिक्षा या जलद व्हायला हव्यात. तरच समाजातील अशा विकृत घटकांवर जरब बसेल. कारण समजावून सांगून पिढ्यानपिढ्या समाजाला कळत नाही, म्हणूनच कडक कायद्याची अंमलबजावणी गरजेची आहे. प्रसिध्द फ्रेंच लेखिका सिमॉन द बोव्हा म्हणते, बाई म्हणून कुणीही जन्म घेत नसते, तर तिला बाई बनवलं जातं.
मी यापुढं जाऊन असं म्हणेन 'बाई' या शरीराच्या परिघात तिला जाणिवपूर्वक अडकवून ठेवलं जातं. कितीतरी घरात मूकपणे स्त्रिया बलात्काराला सामो-या जातात. आता तिच्या स्वतःच्या माणूस असण्याच्या जाणिवा प्रखर होणं महत्त्वाचे आहे.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)