मुंबई - हात धुणे ही साधी पण अत्यंत महत्त्वाची सवय आहे, मात्र कोरोनामुळे आपल्याला याचे अधिक गांभीर्य जाणवले. आपल्याला वारंवार हात धुण्याची सवय ही एक जीवनपद्धती म्हणून अंगिकारावी लागेल, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
दि. 15 ऑक्टोबर रोजी जागतिक पातळीवर साजरा होणाऱ्या ‘जागतिक हात धुणे दिवस’ अर्थात ‘ग्लोबल हॅण्डवॉशिंग डे’ च्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभाग आणि युनिसेफच्यावतीने काल आयोजित राज्यस्तरीय वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या.
या वेबिनारसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बाल विकास अधिकारी, युनिसेफचे वॉश स्पेशालिस्ट युसूफ कबीर, युनिसेफच्या न्युट्रीशन ऑफिसर डॉ. अपर्णा देशपांडे तसेच राज्यभरातील अंगणवाडी कार्यकर्त्या, पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ कार्यक्रमाचा भाग म्हणून हा ‘ग्लोबल हॅण्डवॉशिंग डे’ संपूर्ण राज्यात राबवू असे आवाहन करत ॲड. ठाकूर म्हणाल्या की, स्वच्छतेबाबत मोठमोठ्या लोकांनी मार्गदर्शन केलेले आहे. कोरोनाच्या काळात हात धुण्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
ॲड. ठाकूर म्हणाल्या की, अनेकांसाठी ‘जागतिक हात धुणे दिवस’ असतो हे सुद्धा कदाचित आश्चर्याचे असेल पण हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात हात धुण्याचे महत्त्व लोकांना माहिती आहे; परंतु, अजूनही अनेकजण मातीने हात धुतात. खरेतर साबणानेच हात धुतले पाहिजेत.
अनेक लोक हात धुण्यासारख्या महत्त्वाच्या सवयीबाबत निष्काळजीपणा दाखवतात. या सर्वच गोष्टी आपल्याला सोडून स्वच्छ जीवन जगण्यास सुरुवात केली पाहिजे. या काळात सार्वजनिक आरोग्य, वैयक्तिक आरोग्य व मानसिक आरोग्य या गोष्टींकडेही आपल्याला लक्ष द्यायला लागेल.