रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार रोखा, नाहीतर..

मुंबई - रेमडेसिविर इंजेक्शन हे औषध कोविड रूग्णांसाठी वापरण्यास शासनाची अनुमती आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजूंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे सह-आयुक्त जे. बी. मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सध्या महाराष्ट्रात या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवडा होणार नाही, याबाबत योग्य ते नियंत्रण ठेवले जात असल्याचेही श्री.मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. या औषधाच्या विक्री, वितरण व साठ्यावर आणि काळ्या बाजारावर अन्न व औषध प्रशासन विभाग नियंत्रण ठेवत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असून त्यावर प्रशासनातर्फे नियंत्रण ठेवले जात आहे. 

या औषधाचे वितरण फक्त रूग्णालय व संस्था यांनाच करण्यासाठी अनुमती दिलेली आहे. आजतागायत प्रशासनामार्फत यापूर्वी काही प्रकरणी जप्ती व छाप्यांची कारवाई केली असून संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपींना पोलिसांमार्फत अटक करण्यात आलेली आहे.

प्रशासनामार्फत अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात २४X७ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. त्याचा क्रमांक ०२२-२६५९२३६४ आहे तसेच टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ हा उपलब्ध आहे. काळाबाजार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही सहआयुक्त मंत्री यांनी कळविले आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा औषधाचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध प्रशासन जिल्हा कार्यालयास अथवा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधल्यास औषध मिळूवन देण्यास निश्चित मदत केली जाईल.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !