पुणे - 'काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेनं तयार केलेले महाविकास आघाडी सरकार म्हणजे 'अमर, अकबर, अँथनी' सरकार आहे. हे सरकार त्यांच्या अंतर्गत मतभेदांमुळे पडेल,' असे मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र सरकारवर त्यांनी टीकाही केली.
रावसाहेब दानवे म्हणाले, 'सहा वर्षांपासून काँग्रेस आणि विरोधी पक्षांना जनतेसमोर जाण्यासाठी मुद्दा सापडत नव्हता. काँग्रेस फक्त आपली खराब झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्यांचा माल किमान किमतीत खरेदी करता येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. पण, काँग्रेस पंबाज आणि हरियाणामध्ये रस्त्यावर उतरुन आंदोलने करत आहे. हा विरोधाभास आहे.'
'मोदी सरकारने शेतकऱ्यांना मार्केटमधून मुक्त केले आहे. यापूर्वी अनेकदा शेतकऱ्यांना मार्केटमधूनही रिकाम्या हाताने परत जावे लागत होते. पण, आता तसे होणार नाही. आम्ही व्यापाऱ्यांचे वर्चस्व कमी केले आहे. यापुढे व्यापारी मार्केट कमिटीमधून बाहेर जाऊनही एखाद्या शेतकऱ्याचा माल खरेदी करू शकतो. शेतकऱ्यांना आम्ही पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.
स्वामिनाथन आयोगाच्या 90 टक्के शिफारसी आम्ही लागू केल्या. काँग्रेस विधेयकांबद्दल चुकीचा प्रचार करत आहे', असे रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले. दानवे यांच्या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे, यात आता शंका नाही.