जिल्हा परिषदेचे सीईओ देखील बदलले
अहमदनगर - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली असून, नवे जिल्हाधिकारी म्हणून पुण्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आर. एस. क्षीरसागर हे नगर जिल्हा परिषदेचे नवे सीईओ म्हणून नियुक्त होऊन येत आहेत. राज्य शासनाने सोमवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात या बदल्यांचा समावेश आहे.
राहुल द्विवेदी यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात लोकसभा, विधानसभा महापालिका निवडणूका आणि नगर शहर महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून देखील काम पाहिले. नगर शहरातील सीना नदीवरील अतिक्रमण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले.
तर गेले पाच महिन्यापासून कोरोनाची परिस्थिती हाताळत त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. आता पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले हे नवे नगरचे जिल्हाधिकारी असणार आहेत. त्यांनी आहेत. यापूर्वी नगरला अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.
तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आर. एस. क्षीरसागर यांची बदली झाली आहे. क्षीरसागर हे कोकण विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर परिविक्षाधीन अधिकारी म्हणून काम पाहत होते. तर नगर जिल्हा परिषदेचा सीईओ पदाचा प्रभारी कारभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर हे पाहत होते.