अहमदनगर - साप म्हटले की, मनात भीती निर्माण होते, मग तो वीतभर असो की दोनहात. शेवटी तो सापच. पण, एनिमल रेस्क्यू संस्थेच्या सर्पमित्रांनी अजरासारख्या महाकाय सापाला जीवदान देऊन भूतदयेचा संदेश दिला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड शिवारात हे अजगर आढळले.
पिसोरे गावचे शेतकरी भाऊसाहेब येरकळ हे त्यांच्या मकाच्या शेतात कापणी करत असताना मोठा साप त्यांना दिसून आला. त्यांनी तत्काळ मांडवगण येथील सर्पमित्र उमेश गुळवे यांना माहिती दिली. सर्पमित्र गुळवे यांनी तत्काळ धाव घेत अत्यंत सावधगिरी व शिताफीने अजगरास पकडले.त्या वेळी हा मोठा साप नसून अजगर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
हा अजगर तब्बल नऊ फुट लांब तर त्याचे वजन १४ किलो भरले. पिसोरे खांड परिसराच्या डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे अनेक दुर्मिळ पशु पक्षांचा येथे संचार असतो. हा अजगर भक्ष्याच्या शोधार्थ शेतामध्ये गेला असावा अशी माहिती सर्पमित्र उमेश गुळवे यांनी दिली.
सध्या वन्यजीव सप्ताह सुरू असून या काळात येथील परिसरात अशा प्रकारचे अजगर सापडणे हे समृद्ध जैवविविधतेचे प्रमाण मानले जात आहे. हा पकडलेला अज्रस्त्र अजगर गुळवे यांनी वनविभागाकडे सुपुर्द केला. वनपरिमंडळ अधिकारी एच.आय गारूडकर , आर.एस.रायकर तसेच वनरक्षक हरिष मुंडे यांनी चिखली घाट परिसरातील जंगलातल्या नैसर्गिक अधिवासमध्ये मुक्त संचारासाठी सोडून देत जीवदान दिले.
यावेळी शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे, जालींदर पाडळे, गणेश कुदांडे, संकेत लगड, निरज पाडळे आदी उपस्थित होते.