उस्मानाबाद - एकदा सोडून गेलेल्या लोकांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश नाही म्हणजे नाही. काही झाले तरी त्यांना पुन्हा पक्षामध्ये 'एन्ट्री' मिळणार नाही, असा खणखणीत इशारा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी दिला आहे.
शरद पवार यांनी काल उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा या तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पदमसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजीतसिंग यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून गेलेले अनेक नेते आता पक्षात परत येण्यासाठी पुन्हा वारंवार संपर्क साधत आहेत. पण उस्मानाबाद येथील सोडून गेलेल्याना आता काही झाले तरी पुन्हा पक्षामध्ये प्रवेश मिळणार नाही, असे पवार यावेळी म्हणाले.
पवार यांना पद्मसिंह पाटील आणि त्यांचे सुपुत्राने राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकल्याचे चांगलेच जिव्हारी लागले असल्याचे यावरून लक्षात येते. तसेच एकदा पवार यांनी ठरवले की मग कोणीही त्या निर्णयाला पुन्हा बदलू शकत नाही, हेही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना चांगलेच माहीत आहे.