अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन परीक्षेमध्ये विद्यापीठाच्या कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने श्रीगोंदा येथे निदर्शने केली.
विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत विद्यापीठाच्या कुलगुरूना निषेध पत्र देण्यात आले.
योग्य वेळी परीक्षेच्या अडचणी बंद केल्या नाही, तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. असे झाले तर विद्यापीठासमोर 'राष्ट्रवादी स्टाईल'ने आंदोलन करण्यात येईल, अशा पध्दतीचे निवेदन देण्यात आले. या मागण्या कुलगुरूपर्यंत पोचवण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप उमाप, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आकाश भोसले, यांच्यासह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. प्राचार्यांनी हे निवेदन कुलगुरुपर्यंत पोचवण्याचे आश्वासन दिले.