जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या कडक सूचना
'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिम
अहमदनगर - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम सुरु केली आहे. त्यामुळे 'कोरोनादुत' जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची तपासणी करत आहेत. मात्र, या मोहिमेत गतिमानतेसह सर्वेक्षण कामाचा 'दर्जा' आणि 'गुणवत्ता' याकडे प्रत्येक तालुका स्तरीय यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणांशी संवाद साधून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.
तालुकास्तरावरुन सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, आरोग्य पथक घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबांची माहिती घेत आहे. मात्र, ही माहिती केवळ 'गणना' या स्वरुपात होता कामा नये. त्यातून जिल्ह्याचे आरोग्य विषयक चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही माहिती अधिक काळजीपूर्वक घेतली गेली पाहिजे.
विशेषता कुटुंबातील सदस्यांना असणारे आजार, त्रास तसेच ज्येष्ठ नागरिकांना असणार्या आरोग्यविषयक तक्रारी आदींची माहिती यामध्ये अपेक्षित आहे. त्याचबरोबर, सारीची लक्षणे असणार्या रुग्णांना कोविड चाचणीसाठी संदर्भित केले जावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बहुतांश तालुक्यांनी ऑफलाईन सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण करत आणले आहे. मात्र, हे काम पोर्टलवर माहिती भरल्यानंतरच त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही माहिती भरण्यास यंत्रणांनी प्राधान्य दिले पाहिजे. कामाची गतिमानता आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.
आरटीपीसीआर चाचणी आणि न्टीजेन चाचण्यांच्या माध्यमातून तालुकास्तरावर तपासण्या होत आहेत. त्या रुग्णांची नोंद या अहवालात प्रतिबिंबीत होताना दिसत नाही. त्यामुळे अधिक काळजीपूर्वक आरोग्य विषयक सर्वे होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तालुकास्तरावर आरोग्य यंत्रणेने कामाच्या बाबतीत आणि माहिती अपलोड करण्याच्या बाबतीत काही तालुक्यांनी चांगले काम केले आहे. असेच काम प्रत्येकाकडून अपेक्षित आहे.
जिल्ह्यात सतराशेहून अधिक पथकांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबांना भेट देऊन आपण आरोग्यविषयक माहिती संकलित करत आहोत. आता या कामात वेग आणि गुणवत्ता दोन्ही अपेक्षित आहेत. गेले सहा महिने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत आहे. कामाचा हाच वेग या मोहिमेत कायम ठेवायचा आहे.
जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे जाणवणार्या रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. सर्वेक्षणा दरम्यान लक्षणे जाणवणार्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांची चाचणी करण्याची आवश्यकता आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.