मुंबई - मिशन बिगिन अगेन संदर्भात राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय व खासगी ग्रंथालये कोविड-१९ मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहेत.
मेट्रो रेल्वे देखील निर्देशित कार्यपद्धतीनुसार सुरू करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. सर्व शासकीय व खासगी ग्रंथालये कोविड-१९ संबंधी दिलेली मार्गदर्शक तत्वे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील.
मेट्रो रेल्वे सुद्धा 15ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भात नगरविकास विभागामार्फतची मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील. विवाह व इतर कौटुंबिक कार्यक्रमात पाहुण्यांची संख्या 50 पेक्षा जास्त ठेवता येणार नाही. तर अंतिम संस्कारांसाठी ही संख्या पूर्वी जारी केल्याप्रमाणे 20 असेल. त्याचप्रमाणे उद्यान, पार्क आणि सार्वजनिक ठिकाणे पूर्वीप्रमाणे सुरू राहतील.
15 ऑक्टोबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर असलेले बिजनेस-टू-बिजनेस (B2B) प्रदर्शनासाठीही परवानगी देण्यात आलेली आहे. उद्योग विभागाची मार्गदर्शक तत्त्वे यासाठी लागू असतील. कंटेनमेंट झोनच्या बाहेर जनावरांच्या बाजारासहित स्थानिक आठवडी बाजारांनाही परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शहरी / ग्रामीण स्थानिक प्रशासनाची मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील.