अहमदनगर - ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहेच. परंतु ऋतू आणि कामासाठी विस्थापित होणारे मजूर कुटुंब मुलींना एक घरात आश्रय मिळावा, या भोळ्या भावनेने तिचे लग्न मात्र अल्पवयातच लावून देतात. अन अशा अनेक सुविधांच्या स्वप्नांची जणू राख रांगोळी तयार होते. परिस्थितीमुळे गप्प राहणाऱ्या आणि आपल्या स्वप्नांची आहुती देणाऱ्या मुलींपैकीच एक आहे ही सुविधा (नाव बदललेले आहे).
वयाच्या चौथ्या वर्षी सुविधाच्या वडिलांनी जग सोडले आणि आईने नावऱ्यानंतर एक आधार भेटावा म्हणून एका व्यक्तीसोबत नातं जोडून राहत होते. परंतु दुसऱ्याचे मुल मी का सांभाळावे? त्यात त्या दोन मुली, असे त्या माणसाला वाटले. त्यावेळी सुविधाची मोठी बहीण प्रियांका (नाव बदललेले आहे) ही नुकतीच वयात येत होती. त्यामुळे तिच्या आईने व आई ज्या व्यक्तीसोबत राहते या व्यक्तीने प्रियांकाचे लग्न करायचे ठरवले.
ज्या वेळेस प्रियांकाने लग्नासाठी घरात भांडण केले, त्या वेळेस प्रियांकाची आई आणि तो व्यक्ती सुविधा व तिची मोठी बहीण प्रियांका यांना सोडून निघून गेले. अश्या परिस्थित प्रियांकाने आपल्या बहिणीला सांभाळले. प्रियंकाला व तिच्या बहिणीला आधार कोणाचाच नसल्याने सुविधाचे मानलेले मामा याने प्रियंकाचे लग्न कमी वयात लावून दिले.
परंतु सुविधाला कोण सांभाळेल, हा प्रश्न निर्माण होता. तर त्यावेळेस सुविधाच्या दाजीने तिला आपल्या घरात ठेवण्याचा निर्णय घेतला. सुविधेचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दाजीची तयारी होती. परंतु अशावेळी कधीही न उगवणारे नातेवाईक अचानक त्याच्या घरी आले ते म्हणजे तिचे मानलेले मामा.
आम्ही सुविधाची विचारपूस करण्यास आलो आहोत. सुविधेने शेतात काम केले आहे, असे मोठ्या बहिणीला म्हणत तिला नवीन कपडे आम्ही घेतो, असे सांगून सुविधाला प्रियंकाच्या घरातून घेऊन गेले आणि तिचे लग्न लावून दिले. सुविधा का आली नाही म्हणून मोठी बहीण तळमळीने सुविधाची घरी येण्याची वाट पाहत होती.
सुविधा घरी का नाही आली हे विचारण्यासाठी प्रियांकाने मामाला फोन केला. त्या वेळेस मामाने सांगितले की आम्ही तिचे लग्न लावून दिले आहे. ही माहिती समजताच सुविधाच्या मोठ्या बहिणीने व दाजीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्यासाठीची विनंती केली. त्यावेळी पोलिसांनी तिच्या मानलेल्या मामांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
त्यांना कोणतीही विचारपूस पोलिसांनी त्या मामांना केली नाही, की कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही परस्पर रात्रभर तुमच्या घरी ठेवली. त्यानंतर मुलीला विचारले असता सुविधाने, माझा फक्त साखरपुडा झाला आहे, असे पोलिसांना सांगितले. यावेळी प्रियांका सातत्याने पोलिसांना सांगत होती की, तुम्ही गुन्हा दाखल करा. मामांनी आम्हाला सांगितले की, मुलीचे लग्न झाले आहे. तुम्हाला जे करायचे ते करा.
यावेळी सुविधाला विचारण्यात आले की, तुला कोठे राहण्यास आवडेल? त्यावेळी सुविधांच्या आईकडे जाण्याचा हट्ट धरला. परंतु आई तिला घेण्यास तयार नव्हती. प्रियंकाला विचारले असता तिने गुन्हा नोंदवून घेण्याची विनंती केली.
त्यावेळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून न घेता, परस्पर चाईल्ड लाईन प्रकल्पास १०९८ या नंबरवर कॉल करून पोलिसांनी मुलीचा फक्त साखरपुडा झाला आहे, तिला घरात कोणीही घेण्यास तयार नाही म्हणून सुविधाच्या निवऱ्यासाठीची मदत मागितली. रात्रीच्यावेळी बालकल्याण समितीचा आदेश घेऊन चाईल्ड लाईन ने मुलीला शासकीय बालगृहात तात्पुरता निवारा दिला.
त्यानंतर चाईल्डलाईन प्रकल्पाने बालकल्याण समितीस सुविधाचा बालविवाह झालेला आहे, याची शहानिशा करण्यासाठीचे पत्र दिले. बालकल्याण समितीचे समुपदेशक यांनी सुविधाचे समुपदेशन केले असता असे कळाले की, तिचा फक्त साखरपुडा झाला नसून तिचे लग्न लावण्यात आले आहे.
त्यानंतर बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांनी चाईल्डलाईन समन्वयक महेश सूर्यवंशी यांना या मुलीचा गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले. महेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनातून चाईल्ड लाईन कर्मचारी पूजा पोपळघट आणि प्रवीण कदम यांनी निवड करण्यात आली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी पावसात कसला विचार न करता गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली.
अन रात्री आठ वाजेच्या सुमारास ओलेचिंब अवस्थेत चाईल्डलाईनचे कर्मचारी पोलीस ठाण्यात पोहोचले. तत्पूर्वी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनाही तातडीने पोलीस ठाण्यात चाईल्डलाईन कर्मचारी यांनी बोलावून घेतले.
'त्या' लोकांच्या खुर्चीखाली अंधार
ग्रामसेवकांच्या भूमिका सध्या ग्रामीण सेवकांना माहित नाही अशी परिस्थितीही ग्रामीण व्यवस्थेला घातक ठरणारी आहे. उपस्थित ग्रामसेवाकला आणि अंगणवाडी सेविका यांना 'ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका ह्या गावाचा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतो' हे त्या ग्रामसेवकाला माहीतच नव्हते.
त्यावेळी चाईल्ड लाईनच्या कर्मचाऱ्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि ग्रामसेवकांच्या बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून असलेल्या भूमिका या उपस्थित ग्रामसेवक यांना समजावून सांगितल्या.
चाईल्डलाईनची आक्रमक भूमिका
या बालविवाहाच्या गुन्ह्यात फिर्यादी म्हणून सुविधाची मोठी बहीण होती. तयार ज्यावेळी कोणीही फिर्यादी होण्यास तयार नसेल तेव्हा ग्रामसेवक फिर्यादी म्हणून पुढाकार घेऊ शकतो आणि गुन्हा दाखल करू शकतो. हेही अक्षरशः त्या ग्रामसेवक यांना चाईल्डलाईनच्या कर्मचाऱ्यांनी समजावून सांगितले. परंतु साक्षीदार कोण असेल हा प्रश्न होता. तरीही ते ग्रामसेवक साक्षीदार होण्यास तयार नव्हते.
त्यानंतर मात्र पोलीस व चाईल्डलाईन कर्मचाऱ्यांनी विनंती केली, कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. शेवटी ग्रामसेवक यांनी साक्षीदार म्हणून नाव दिले आणि त्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध, आणि लग्न ज्यांनी लावून दिले, अशांवर बालविवाह कायदा २००६ नुसार गुन्हा नोंदविण्यास सांगितले. अन अखेर बालविवाहाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
अक्षरशः दुपारी ३ वाजता पावसाने ओल्या ड्रेसमध्ये भिजलेले चाईल्डलाईनचे दोनही कर्मचारी ६ तास पोलीस ठाण्यात त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहिले आणि सुविधाला बालविवाहाच्या दुविधेतून सुटका करून सुटकेचा श्वास घेतला. त्याचवेळी गुन्हा नोंदविल्यानंतरही लाईट गेल्यामुळे रात्री ६ वाजता चाईल्डलाईनचे कर्मचारी सुविधाला प्रश्न तडीस नेण्याकरिता म्हणजेच पूर्णतः कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी तेथेच निवासी थांबले.
सकाळी पाऊस चालूच होता. ओलेचिंब कपडे, रात्रीची थंडी अंगावर काढत सकाळीच १० वाजता चाईल्डलाईन कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कागदोपत्री पूर्तता केली. खरेतर यामध्ये परिस्थितीला मागे ठेऊन सुविधेला दुविधेतून बाहेर काढणे हे गरजेचे होते. म्हणून पाऊस, वारा, लाईट यांची कारणे न धरता 'मी नाही तर कोण, आत्ता नाहीतर कधी' या विचाराने चाईल्डलाईनच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. अन सुविधाला न्याय मिळाला.
यावेळी ठाणे अंमलदार बढे व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनीही संपूर्ण टीमचे आभार मानत कौतुक केले. अशा अनेक सुविधा या बालविवाहाच्या दुविधेला बळी पडतात. त्यांनाही उमलण्याचा हक्क आहे, तो हिरावून घेऊ नका.
आहे नारी शक्ती,
आहे दुःखी कष्ट ती,
तिला समजून घेऊन
जगू द्या ना
आहे तीच माता जिजाऊ
आहे मेहनतीही ती
तिच्या नजरेने जग
तिला बघू तर द्या ना...
- पूजा पोपळघट (अहमदनगर)
लेखिका चाईल्डलाईनच्या सदस्य आहेत.