मुंबई - महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने मोठा हाहाकार उडवला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि मराठवाड्याच्या काही भागात नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि पावसाचे पाणी वस्त्यांत शिरले आहे. सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर, मुंबई, कोकण आदी भागात २-३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
सोलापूर, सांगली व पुण्यात विविध घटनांत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. या तीन जिल्ह्यांत २० हजारांवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थितीचा आढावा घेऊन यंत्रणांना पिके, मालमत्ता नुकसानीचे पंचनामे गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
परतीचा पाऊस, वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना निर्देश दिले. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर व बारामतीत एनडीआरफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. वायुसेना, नौदल, लष्कर यांना 'हाय अलर्ट'वर सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पिकांचे नुकसान, घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. पुण्यात २४ तासांत ९६ मिमी पाऊस पडला. शहरात ५० सोसायट्या, घरांच्या परिसरात पाणी शिरले. दौंड-खानोटा गावात ओढ्यात चार जणांचा मृत्यू झाला.