सुखी माणसाचा 'सदरा' भेटलाय का कधी कोणाला? ज्याला भेटेल तो नक्कीच भाग्यवान असावा.. कारण इथं सगळीच माणसं कुठल्या ना कुठल्या दुःखाने घेरलेलीयेत.. आता प्रत्येकालाच आपल्या दुःखाचं भांडवल करायचं नसतं म्हणून मग मी किती 'स्ट्रॉंग' आहे आणि किती सुखी आहे हे दाखवण्याची केविलवाणी धडपड असते..
आणि ना, कोणाचंही दुःख छोटं किंवा मोठं नसतं.. दुःख हे शेवटी दुःख असतं.. म्हणजे एखादी गोष्ट जी एखाद्याला सामान्य वाटेल तीच गोष्ट एखाद्याच्या दुःखाचं कारण असू शकते आणि एखाद्याचं खूप मोठं दुःखही दुसऱ्याला अगदी क्षुल्लक वाटू शकतं..
आपल्या प्रत्येकाच्या दुःखाची व्याख्या वेगळी आहे पण आहे नक्कीच.. त्यामुळं 'अरे काय हा एवढ्याशा गोष्टीवरून डोकं धरून बसलाय' असं वाटणं चुकीचंच.. सामान्य वाटणारी एखादी गोष्ट एखाद्याच्या आयुष्यावर किती गंभीर परिणाम करू शकते याचा आपल्याला अंदाजही नसतो आणि आपण लोकांना ग्राह्य धरत जातो.. अन इथंच आपण माती खातो..
नाती दुरावण्यामागे हे सगळ्यात मोठं कारण असावं कदाचित.. कारण अनोळखी व्यक्तीने केलेल्या वारापेक्षा प्रेमाच्या माणसाच्या शब्दांनी केलेला घात कैक पटींनी खोल असतो आणि त्यावर त्याच प्रेमाच्या व्यक्तीने फुंकर मारणं अपेक्षित असतं.. हे ज्याला जमतं तोच नाती टिकवू शकतो.. आणि राहिला प्रश्न दुःखाचा तर.. फक्त आपली प्रेमाची व्यक्ती सोबत असावी.. मग..??
तुम साथ हो जब अपने..
दुनिया को दिखा देंगे..!
हम मौत को जिने के..
अंदाज सिखा देंगे..!!
- प्राची अमोल (अहमदनगर)