मुंबई - अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या तपासप्रकरणी मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर ८० हजार जण टपले आहेत. या सर्वांची सोशल मिडियावर बोगस खाती उघडण्यात आली होती, अशी खळबळजनक माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणाची मुंबई पोलिस चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
थायलंड, तुर्की, इंडोनेशिया, जपान, सौदी येथून ही खाती उघडण्यात आली होती. शिव्या देणे, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस काहीतरी लपवत असल्याचा दावा करणे, अफवा पसरवणे यासाठी या बोगस खात्यांचा वापर करण्यात आला होता, असे परमबीर सिंह म्हणाले. या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई देखील केली जाणार आहे, अशी ग्वाही आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत अनेक सोशल मीडिया अकाउंट आणि बनावट अकाउंटवर दोन गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती मुंबई सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली. मुंबई पोलिस आयुक्त व पोलिस दलाविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे.
दरम्यान ही बोगस खाती उघडून मुंबई पोलिसांची बदनामी करण्यामागे भाजपचा आयटी सेल कार्यरत आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. खोटा प्रचार करण्यासाठी उघडलेली खाती हा आघाडी सरकार अस्थिर करण्याचा कट होता, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.