'हाथरस' प्रकरणामुळे आपण सर्वच व्यथित झालो आहोत. समाजातील वेगवेगळ्या स्तरातून या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जातोय. आरोपींना फाशी देण्याच्या शिक्षेपासून ते......पर्यतच्या शिक्षांची मागणी होत आहे. हाथरस हे 'एक' प्रकरण आहे. असे 'अनेक' हाथरस प्रकरणं आपल्या अवतीभवती घडत असतात.
हाथरस प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हायलाच हवी. आरोपींना पाठीशी घालणाऱ्या, त्यांचा बचाव करणाऱ्या शक्तींचा निषेध करायलाच हवा. त्यांना त्यांची जागाही दाखवून द्यायलाच हवी. परंतु हे सर्व करत असताना 'स्त्री शोषणा'मागच्या कारणांचा शोध घेणे, बलात्कारी प्रवृत्ती निर्माण करणाऱी परिस्थिती समजावून घेणेही महत्त्वाचे वाटते.
बलात्कारी प्रवृत्ती निर्माण होणे किंवा त्यांना अनुकूल वातावरण निर्माण करणे, यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे 'स्त्री -पुरूष असमानता', 'स्री'चं 'वस्तूकरण' करणारी मानसिकता. यांची बीजं पेरणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या कृती व उक्ती.
मग ते गर्भलिंग चिकित्सा करून गर्भपात करणारे डॉक्टर असोत, की 'बाई म्हणजे पायातली वहाण ती पाण्यातच शोभती; बायकु करताना लक्षात ठिवा तीचा नाकाचा शेंडा मोठा पाहिजे; पाऊल सपाट नको; नोकरी करणारऱ्या बायकानु लाजा धरा लाजा, घरात काय काम करता तुम्ही.' असे सांगत स्त्री - पुरूष जन्माबाबत अशास्त्रीय व विषमतामुलक गणित मांडणारे, स्वत:ला प्रबोधनकार, म्हणवणारे असोत.
हे लोक स्त्रीच्या दुय्यमत्वाचे व पुरूषी वर्चस्ववादाचे संस्कार त्यांच्या वक्तव्यातून करत असतात. त्यातूनच स्त्रीकडे बघण्याचा दुषित दृष्टिकोन समाजात रूजवत असतात. समाज म्हणून, एक व्यक्ती म्हणून, स्रीविषयी मतं कलुषित करणारऱ्या प्रवृत्तीं विरोधात आपण काही भुमिका घेतलीच पाहिजे. अशा प्रवृत्तींना पायबंद घालायला हवा. स्त्री सन्मान वाढवणाऱ्या कृती, उक्ती करायला हव्यात. पण अनेकदा घडते मात्र उलटेच.
कोणी यावर काही उघडपणे बोलतच नाही. कुणी एखाद्याने अशा प्रवृत्तीं विरोधात आवाज उठवला तर, जात-पात, नातं-गोतं, गाव, आर्थिक लाभ, राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून आवाज उठवणाऱ्या व्यक्तीलाच धारेवर धरले जाते. दबाव, धमक्या, असभ्य शेरेबाजी आणि बरंच काही... आधुनिक विचारसरणीचे, उदारमतवादी म्हणवणारेही याबाबत व्यक्त होत नाहीत.
दुष्टवृत्तीं विरोधात आवाज उठवणाऱ्याच्या बाजूने कोणी उभे रहात नाहीत. त्यांचे मौन हेच अपप्रवृत्तींची ताकद वाढविणारे असते. सज्जन निष्क्रिय व दुर्जन सक्रिय झाल्यामुळे दुर्जनांच्या झुंडी वाढतात. स्त्रीयांबद्दल असभ्य भाषा, अश्लील विनोद, तीचं दुय्यमत्व रूजवणारी वक्तव्यं, आणि शेवटी सुरु होते तिच्या जन्माबाबत थेट 'अस्वागतार्हते'ची भाषा.
हे सर्व आपल्याला पटत असेल. आपण दाद देत असू , मौन बाळगत सहन करू.. किंवा आवाज उठवणाऱ्या बाजूला गेलो नाहीत.. तर मात्र 'हाथरस'सारख्या घटनांबाबत बोलण्याचा, निषेध व्यक्त करण्याचा व आरोपींना शिक्षेची मागणी करण्याचा आपणांस खरंच अधिकार आहे का ? हा मोठा सवाल आहे.- Adv. रंजना पगार-गवांदे
(राज्य सचिव, महाराष्ट्र अंनिस)