माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य
जळगाव - ‘नाथाभाऊंनी आमच्यासोबत राहावे ही आमची इच्छा आहे. त्यांना राजकारण चांगले कळते. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील.’ असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे फडणवीस आणि खडसे यांच्यातील राजकीय वादाला आणखी फोडणी मिळाली आहे. एका रुग्णालयाच्या उद्धाटनासाठी फडणवीस येथे आले असता खडसे यांनी पाठ फिरवली असता त्यांनी हे वक्तव्य केले.
फडणवीस आणि आमदार महाजन यांच्याशी असलेले खडसे यांचे संबंध लक्षात घेता खडसे समारंभाला जाणार नाहीत, अशी शक्यता व्यक्त होत होती. त्यानुसार ते गेले नाहीत. मात्र, त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे व मुक्ताईनगर भाजपचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले. त्यामुळे खडसे यांच्या अनुपस्थितीचीच जास्त चर्चा होती. त्यामुळे फडणवीस खडसेंच्या पक्षांतराबाबत सूचक बोलले, असे सांगितले जात आहे.
खडसे प्रकरणावर फडणवीस काही भाष्य करतात का, याची उत्सुकता होती. मात्र, त्यांनी यावर बोलणे टाळले. नंतर मात्र पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘नाथाभाऊंनी आमच्यासोबत राहावे ही आमची इच्छा आहे. त्यांना राजकारण चांगले कळते. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील.’ दरम्यान एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार आणि लवकरच मंत्री होतील, असा दावा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.