'या' कोरोनादुताला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही सलाम

अहमदनगर - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. कोरोनादूत प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची तपासणी करत आहेत. त्यांच्या याच कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
 

रविवारी त्यांनी नागरिकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बोटा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पथकात कार्यरत आरोग्य कर्मचारी सुदाम जाधव यांच्या संवेदनशीलतेचे त्यांनी कौतुक केले. ज्येष्ठ महिलेला वेळेवर दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर योग्य वेळी उपचार सुरू करण्यासाठी जाधव यांनी पुढाकार घेतला होता.

जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविली जात आहे. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी यांचे पथक प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आरोग्य विषयक माहिती गोळा करत आहेत. त्यांची ऑक्सिजन लेवल आणि शरीराचे तापमान मोजले जात आहे. विशेषतः को- मोरबिड अर्थात इतर आजार असणारे आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांची माहिती घेऊन त्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी आरोग्य यंत्रणा राबत आहे. 

सुदाम जाधव यांच्या पथकाला केंद्रप्रमुख डॉ. कापसे यांनी अकलापुर येथील सर्वेक्षणाचे काम दिले होते. यावेळी त्यांना या गावातील एक ६८ वर्षीय महिलेला ताप सर्दी व श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे जाणवले. जाधव यांनी तपासणी केली असता या महिलेची ऑक्सिजन लेवल  ७८ टक्के आढळून आली. तात्काळ त्यांनी डॉ. कापसे यांना संपर्क केला. त्यानंतर या महिलेला उपचार करून त्यांची चाचणी करण्यात आली. 

पुढील उपचारासाठी त्यांना कोविड हेल्थ सेंटर संगमनेर येथे संदर्भित करण्यात आले. त्यांचा अहवाल पॉजीटिव आला. तात्काळ उपचार सुरू झाल्याने आज त्या आजारातून बऱ्या झाल्या आहेत. सुदाम जाधव यांनी योग्य वेळी निर्णय घेतल्याने महिलेला तात्काळ उपचार मिळू शकले.

जाधव यांच्या या संवेदनशीलतेबद्दल जिल्हाधिकारी द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही कौतुक केले. या मोहिमेत काम करणारे सर्व कोरोनादुत अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !