नाशिक - कोरोनाविषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणपध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षणप्रणाली गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषदेने मोबाईल टॉवर जोडणीच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या बैठकित ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार डॉ. नितीन पवार, आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, मालेगावच्या महापौर ताहेरा शेख, उपाध्यक्ष सयाजी गायकवाड मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, माध्यमिक शिक्षण अधिकारी वैशाली झनकर, प्राथमिक शिक्षण अधिकारी राजीव म्हसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ. कपिल आहेर उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले,
कोरोनाकाळात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,यासाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरु करण्यात आली. ग्रामीण भागात व आदिवासी भागात नेटवर्कची समस्या असल्याने तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ पुरेशा प्रमाणात घेता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मोबाईल टॉवरच्या जोडणीचे काम प्राधान्याने करण्यात यावे. तसेच जिल्हा परिषद शाळांबरोबरच खाजगी शाळेतही सुरु असलेल्या ज्ञान दानाचा कामाचा आढावा शिक्षण विभागाने वेळोवेळी घ्यावा
कोरोनाच्या काळात शाळा बंद असतांनाही जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना शिक्षण पोहचविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहे. त्यामध्ये तंत्रसेतू ॲप, व्हाटसॲप, ऑनलाईन झुम, जिओ मीट, गुगल क्लासरुम इत्यादी वापरण्यात आलेली ऑनलाईन माध्यमांचा प्रभावी वापर केला. परंतु त्याचबरोबर ज्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण देता येवू शकत नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन ओट्यावरच्या शाळा, गल्ली मित्र, गृहभेटी सारखे स्तुत्य उपक्रम राबविले आहेत.